वेदांत ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले. फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात येण्याची सर्व प्रक्रिया झाली होती, असं ठाकरे सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेल्या सुभाष देसाईंनी म्हटलं आहे. यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक 1 लाख 58 हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?, असा सवाल याठिकाणी राज ठाकरे यांनी विचारला आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून ट्विट केलं आहे.फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?
राज ठाकरे यांनी पुढे असंही त्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, हा सर्व प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं.