जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
गेले बरेच दिवस सांगली ,सोलापूर, कोल्हापूर या रेल्वे प्रवाशांकडून व रेल्वे संघर्ष समितीकडून वारंवार जी मागणी होत होती की ,कोल्हापूर- कलबुर्गी एक्सप्रेस नियमितपणे चालू करावी, यास आज अखेर यश आले. श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वारकरी भक्तांसाठी, श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या व श्रीक्षेत्र गाणगापूरच्या दत्त भाविकांसाठी तसेच श्रीक्षेत्र तुळजाभवानीच्या देवी भक्तांसाठी, या नियमित धावणाऱ्या *कोल्हापूर- कलबुर्गी* एक्सप्रेसचा फारच उपयोग होणार आहे .त्यामुळे रेल्वे प्रवासी तसेच सदरहू दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या अतिशय आनंदाचे वातावरण पसरले आहे. गेले काही दिवस सदरहू *कोल्हापूर- कलबुर्गी* एक्सप्रेस चालू होण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनांच्या, लोकप्रतिनिधींच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या पाठपुराव्यामुळे आज याला यश येऊन, आज पासून ही रेल्वे नियमित धावणार आहे. *चार तीर्थक्षेत्रांच्या* भाविकांना जाण्या येण्यासाठी, ही एक पर्वणीच म्हणावी लागेल .सदरची रेल्वेची मागणी रेल्वे मंत्रालयाकडून पूर्ण होण्यास, जवळपास दोन वर्षाचा कालावधी गेला. यंदाच्या वर्षीच्या नवरात्रोत्सवासाठी, तुळजापूरच्या तुळजाभवानी भक्तांसाठी तसेच सोलापुरातील अंबाबाई भक्तांसाठी महालक्ष्मीच्या दर्शनाची या रेल्वेमुळे फार मोठी सोय होणार आहे .सदरची *कोल्हापूर कलबुर्गी एक्सप्रेस* कोल्हापूरहून ३.०० ला सुटून हातकणंगले- जयसिंगपूर असे करत मिरजेला पोहोचून मिरज येथून ४.५५ मिनिटांनी सुटून पंढरपूर- कुर्डूवाडी- सोलापूर -अक्कलकोट- गाणगापूर मार्गे जाऊन रात्री १०.४५ मिनिटांनी कलबुर्गी ला पोहोचेल.