- मराठा बहुउद्देशीय संस्थेची पत्रकार परिषदेत आग्रही मागणी
- मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन टप्याटप्याने तीव्र करण्याचा इशारा
कोल्हापूर : नंदकुमार तेली
काही स्वार्थी राजकीय लोकांच्या हितापोटी कायमच शेतकरी राजाचा बळी जातो. ही वस्तुस्थिती असून अशा घटना थांबणे गरजेचे आहे. यासाठी दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.,हलकर्णी हा कारखाना चालू राहिलाच पाहिजे, अशी आग्रही मागणी मराठा बहुउद्देशीय संस्थेतर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष प्रसन्न शिंदे म्हणाले, शेतकरी कारखाना, कामगार, कारखानदार, छोटे व्यावसायिक, छोटे व्यापारी यांचे संपूर्ण अस्तित्व उलाढाल हे या कारखान्यावर अवलंबून आहे. म्हणूनच मराठा बहुउद्देशीय संस्था यांचा दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हलकर्णी हा सुरू राहण्यासंदर्भात अथर्व इंटरनेट प्रा. लि., यांच्या सध्या वाटाघाटी व समन्वयाची भूमिका आहे. सध्याचे अथर्व इंटरनेटचे मालक मानसिंग खराटे हे असून ते मराठा उद्योजक आहेत. मराठा बहुउद्देशीय संस्थेचा त्यांच्या समन्वयाच्या भूमिकेश जाहीर पाठिंबा आहे. तसेच संस्था त्यांच्या शेतकरी व कामगार हिताच्या निर्णयाच्या पाठीशी ठाम उभी आहे. त्याचप्रमाणे जर ते कामगारांचे काही प्रश्न असतील तर व्यवस्थापन व कामगार संघटना यांची कमिटी करून चर्चेअंती अंतिम निर्णय घ्यावा, अशी संस्थेचे ठाम मत आहे.
उपाध्यक्ष उदय लाड म्हणाले, सर्वसमावेशक हिताचे निर्णय घेऊन कारखाना चालूच राहिला पाहिजे. जर कोणी कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न करत असेल. तर मराठा बहुउद्देशीय संस्था टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. या पत्रकार परिषदेत संस्थेचे सचिव विकास सुर्वे, पश्चिम महाराष्ट्र उद्योजक प्रतिनिधी रमेश अबिटकर, खजानिस सम्राट बराले आदी उपस्थित होते.