जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी)
सांगलीतील कृष्णा नदीत विना प्रक्रिया असलेले, शेरी नाल्याचे पाणी, मिसळत असल्या प्रकरणी सात दिवसात खुलासा करण्यात यावा अन्यथा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कोल्हापूर विभागीय अधिकारी जे. एस .साळुंखे यांनी, संबंधित सांगली ,मिरज, कुपवाड महानगरपालिकेस दिला आहे. कृष्णा नदीचे पात्रात शेरी नाल्याचे, विना प्रक्रिया झालेले पाणी सोडले जात असल्यामुळे, सामाजिक कार्यकर्ते अॅड. ओंकार वांगीकर यांनी जिल्हाधिकारी व महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला यापूर्वी नोटीशी दिल्या होत्या. गेले बरेच दिवस माध्यमांमधून प्रसिद्ध होत असलेल्या बातम्यांची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कोल्हापूर विभागीय अधिकारी जे .एस .साळुंखे यांनी, महापालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे. सदरहू नोटीशित, शेरी नाल्याचे विना प्रक्रिया असलेले पाणी नदीत सोडणे, सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया बाबतीत हलगर्जीपणा, धुळगाव योजना हाताळण्यात आलेले अपयश, शिवाय पर्यावरणाच्या सर्व नियमांचे उल्लंघन या सर्व बाबतीत, नागरिकांच्या तक्रारी असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे यापूर्वीचे अहवाल व आवश्यक चौकशी नंतरही आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा होत नसल्याने, हा विषय अतिशय संवेदनाशील व गंभीर असल्याचे दिसून येत आहे .त्यामुळे जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम १९७४ कलम ३० अ आणि हवा प्रदूषण व नियंत्रण अधिनियम १९८१ नुसार, प्रदूषण नियंत्रण मंडळास प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून, नोटीस बजावण्यात येत आहे. यापुढील ७ दिवसात सदरहू प्रकरणी योग्य ते उत्तर न आल्यास, पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल हे सर्व नोटीशित नमूद करण्यात आलेले आहे.