जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर देशभरात व महाराष्ट्रात सर्वत्र वाजत गाजत उत्साहाने मंगलमूर्ती विघ्नहर्ता गणरायाचे विसर्जन झाले आहे .मिरवणुकीत घोडेस्वारांचे पथक, लेझीम खेळांचे पथक, ढोल- ताशांचे पथक, बँड पथक ,आदि पथके सामील होती. " *मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या* "अशा गजरात गुलालांची उधळण करत ,मनसोक्त नाचत, गणेश भक्तांच्यात एक उत्साह संचारला होता. प्रशासनाने अधोरेखित केलेल्या रस्त्यांच्या मार्गाने मिरवणुका मार्गस्थ होत होत्या. काही ठिकाणी मानांच्या गणपतीच्या दर्शनासाठी गणेश भक्त आणि भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. देशात आणि राज्यात काही ठिकाणी पावसाने थोडीफार विश्रांती घेतली होती त्याबरोबरच काही ठिकाणी पावसाने ही विसर्जन मिरवणुकीस हजेरी लावली होती. पुण्यात मानाच्या पहिल्या कसबा गणपतीला पुष्पहार ,पुणे शहराचे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्या हस्ते घालून मिरवणुकीला प्रारंभ झाला. मुंबईत बऱ्याच ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली तरी ठाणे आणि परिसरात जोरदार पाऊस झाला होता. सांगली जिल्ह्यात मिरज मध्ये पारंपारिक विसर्जन मिरवणुकीसाठी रस्त्यावर काही ठिकाणी भव्य स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या .महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी मूर्तीचे दान करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने केलेल्या प्रयत्नाला व आवाहनाला अनुसरून नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात कृत्रिम तलाव व विसर्जन कुंडाचा, गणेश मूर्ती विसर्जनासाठी ,फारच उपयोग झाला. वर्ध्यात गणेश मूर्तींचे विसर्जन, प्रशासनाने तयार केलेल्या विसर्जन कुंडात करणाऱ्या कुटुंबाला "पर्यावरण मित्र "म्हणून प्रमाणपत्र दिली आहेत .महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने उद्या सकाळपर्यंत वाहतूक निर्बंध जारी केले असून, मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. भारताच्या राजधानी दिल्लीत ,महाराष्ट्र सदना व्यतिरिक्त महाराष्ट्र मंडळे आणि इतर काही ठिकाणी गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने गणेश विसर्जनाच्या मिरवणूक काढल्या होत्या. महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी विसर्जन मिरवणुका पार पडल्यानंतर, पोलिसांनी जल्लोषाच्या स्वरूपात आनंद साजरा करून, आपल्या अंतकरणात असलेल्या गणरायाच्या प्रति भक्ती भाव व्यक्त केला. महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात स्थानिक पोलीस प्रशासनामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.