ज्ञानवापी मशिदी प्रकरणी आज सुनावणी होत असताना संपूर्ण देशाचे लक्ष निकालाकडे लागून राहिले आहे. आज न्यायालयाच्या निर्णयाने स्पष्ट होणार आहे की ज्ञानवापीमध्ये मशिद होती की मंदिर. त्याचसोबत प्लेसेज ऑफ वर्शिप ॲक्ट 1991 लागू होणार का?,हे स्पष्ट होणार आहे. या निर्णयाचा परिणाम ज्ञानवापी संबंधित सत्र न्यायालयात सुरु असलेल्या इतर प्रकरणांवरही होणार आहे. आज दुपारी दोन वाजता न्यायालय आपला निर्णय देणार आहे. ज्ञानवापी मशीद-शृंगार गौरी मंदिरप्रकरणी येथील न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी होत असून निकाल देण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज वाराणसीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. पाच वेगवेगळ्या महिलांनी एकत्र येत ज्ञानवापी मशिदीच्या मागच्या दिशेला असलेल्या शृंगार गौरीची दररोज पूजाअर्चा करता यावी अशी मागणी करत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान मे महिन्यात सिव्हील जज रवि कुमार दिवाकर यांनी ज्ञानवापी मशिदीचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले होते. चार दिवस सुरू असलेल्या या सर्व्हेक्षणात १५०० फोटो आणि १२ तासांची व्हिडिओग्राफी करण्यात आले. व या सर्व्हेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर केला होता. हिंदू पक्षाच्या दाव्यानुसार ज्ञानवापी मशिद परिसरात ठिक-ठिकाणी प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले होते. तसंच, मशिदी परिसरात असलेल्या वजुखान्यात कथित शिवलिंग सापडल्याचा दावादेखील करण्यात आला होता. मात्र, मुस्लिम पक्षाकारांनी तो पाण्याचा कारंजा असल्याचं म्हणत हिंदूपक्षकारांचा दावा फेटाळला होता.वाराणसीच्या अंजुमन इंतजामिया मशिद कमिटीने ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ज्ञानवापी परिसरात असलेली मशिद ५०० वर्ष जुनी असून स्वातंत्र्यपूर्व काळात व नंतरच्या काळातही ती त्याच परिसरात उभी आहे. अशावेळी प्लेसेज ऑफ वर्शिप ॲक्ट १९९१अंतर्गंत सिव्हिल कोर्टाचा मशिदीचा सर्व्हे करण्याचा आदेश चुकीचा आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण जिल्हा न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश दिले होते.