जनप्रतिसाद न्यूस नेटवर्क
(अनिल जोशी)
भारतीय परंपरेतील संस्कृतीस अनुसरून ,आपल्या कुटुंबातील मृत झालेल्या पूर्वजांच्या ऋणातून काही अंशी मुक्त होण्याचा मार्ग म्हणजेच श्राद्धविधी होय .आज दिनांक १० सप्टेंबर २०२२ पासून २५ सप्टेंबर २०२२ पर्यंत पितृपक्ष पंधरवडा आहे. आणि २५सप्टेंबर २०२२ ला सर्वपित्री अमावस्या आहे तसेच १९ सप्टेंबर २०२२ रोजी अविधवा नवमी आहे. सदरहू अविधवा नवमीस, आपल्या घरातील मृत आई वडिलांचे तसेच मृत बायकोचे एकत्रित श्राद्धविधी करतात .ज्याना वर्षभर कोणत्या ना कोणत्या कारणाने, आपल्या घरातील मृत झालेल्या व्यक्तींच्या तिथीला श्राद्ध करता आले नाही तर, पितृपंधरवड्यात सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध करतात.
आपल्या कुटुंबातील मृत झालेले पूर्वजांचे आत्मे या पक्ष पंधरवड्यात, आपल्या घरी येतात व श्राद्ध विधीने आत्मसंतोष होऊन ,आपल्या कुटुंबातील व्यक्तींना आशीर्वाद देऊन जातात असा समज आहे. श्राद्धविधीसाठी घरातील मृत झालेल्या व्यक्तींच्या आवडीचे पदार्थ एकत्र करून, पत्रावळीत वाढवून आपल्या कुटुंबातील मृत झालेल्या सर्व पूर्वजांच्या नावांचा व गोत्राचा उल्लेख करून विधीपूर्वक अर्पण करतात .देवांना नैवेद्य दाखवून तृप्ती होते, माणसांना अन्न खाऊन तृप्ती होते आणि पूर्वज-पितरांना अन्नाच्या पदार्थाच्या वासाने तृप्ती होते.