जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे शारदीय नवरात्रोत्सासाठी, करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील तयारी जवळपास पूर्ण होत आली आहे. त्याबरोबरच देवी भक्तांसाठी दर्शनाच्या सोयीसाठी, भवानी मंडपापर्यंत उभारल्या जाणाऱ्या मंडपाची तयारी सुरू झाली आहे. यंदाच्या वर्षी शारदीय नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात एक भव्य मंडप उभारणेस सुरुवात झाली असून, त्या मंडपात दरवर्षीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. श्रीदेवीच्या आसपासचा परिसर स्वच्छ केला असून, श्रीदेवीच्या मंदिरावर आकर्षक दिव्यांची रोषणाई करण्याचे काम चालू आहे. शारदीय नवरात्रोत्सवात श्री देवीच्या उत्सव मूर्तीसह चांदीचे सर्व अलंकार दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे स्वच्छ केले असून ,उद्यापासून पूर्वम पार असलेल्या सोन्याच्या दागिन्याची व अलंकाराची पाॅलिश वगैरे करण्याची कामे चालू होणार आहेत. महालक्ष्मी धर्मशाळेत येणाऱ्या सर्व देवी भक्त -भाविकांची सोय होईल अशी व्यवस्था करण्यात येणार असून, श्री महालक्ष्मी अन्नछत्र या संस्थेची देखील परगावहून येणाऱ्या भक्त भाविकांच्या साठी, प्रसादाचे नियोजनाची तयारी पूर्ण झाली आहे .अन्नछत्रांमध्ये दहा हजार भक्त भाविकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती श्री महालक्ष्मी अन्नछत्र समितीचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी दिली. दरम्यानचे काळात कोल्हापुरास येण्यासाठी एसटी महामंडळाने देखील कंबर कसली असून, भक्त भाविकांसाठी कोल्हापुरास येण्या-जाण्याच्या सोयीसाठी जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षीच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या साठी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी, जिल्हा पोलीस प्रशासनाने देखील योग्य त्या बंदोबस्ताची तयारी पूर्ण केली आहे.