गेल्या वर्षापेक्षा दूध उत्पादकाना मिळणार १९ कोटी जादा
- "गोकुळ दूध" चेअरमन विश्वास पाटील
- दूध उत्पादकांची दिवाळी गोड
- गोकुळकडून दरफरकापोटी १०२ कोटी रुपयांचे वाटप
कोल्हापूर : (जनप्रतिसाद न्युज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)
“ दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळचा कणा आहे. गोकुळ दूध संघामार्फत सातत्याने दूध उत्पादक सभासदाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जातात. यंदा फरकापोटी दूध उत्पादकांना गेल्यावर्षीपेक्षा १९ कोटी रुपये इतकी जादा रक्कम मिळणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही म्हैस व गाय दूध दर फरकापोटी १०२ कोटी ८३ लाख रुपये इतकी रक्कम प्राथमिक दूध संस्थाच्या खात्यावर ४ ऑक्टोबर २०२२ रोजी जमा करण्यात येणार आहे. अशी माहिती गोकुळचे चेअरमन विश्वासराव नारायण पाटील यांनी दिली.
गोकुळच्या सभासदहिताच्या योजनेविषयी चेअरमन विश्वास पाटील म्हणाले, “संघाच्या वेगवेगळया योजनेअंर्तगत वैरण बियाणे, चाफकटर, मिल्को टेस्टर, वासरू संगोपन अनुदान, जातीवंत म्हैस व गाय संगोपन अनुदान, दूध उत्पादक भविष्य कल्याण निधी योजना, किसान पॅकेज, पशुखाद्य, पशुवैद्यकीय सेवा अशा २७ योजनेवर प्रतिलिटर ७५ पैसे म्हणजेच अंदाजे ३७ कोटी ४१ लाख इतकी रक्कम उत्पादकांना वेगवेगळया अनुदान व सेवाप्रित्यर्थ दिले आहेत. तसेच “दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध दर देण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध आहे. तसेच
राज्याचे माजी ग्रामविकास व कामगारमंत्री आमदार व गोकुळचे नेते हसन मुश्रीफ व कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सभासद दूध संस्था तसेच दूध उत्पादकांच्या सहकार्यामुळे गोकुळची यशस्वी वाटचाल सुरू आहे. यापुढेही गोकुळची वाटचाल तितक्याच दिमाखात व यशस्वीपणे पुढे चालू ठेवू. यासाठी दूध संस्था व उत्पादकांचे सहकार्य मोलाचे आहे. यानंतर चेअरमन पाटील यांनी दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक, कर्मचारी, वाहतूक ठेकेदार व हितचिंतकांना दसरा व दीपावलीच्या गोकुळ परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा दिल्या.
गोकुळचे नेते व आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दूध दर फरकाच्या रकमेची घोषणा करण्यात आली. आमदार मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूध उत्पादकांना 70 टक्के परतावा मिळावा, असे राष्ट्रीय पातळीवर आवाहन केले होते. तथापि गोकुळ दूध संघाकडून दूध उत्पादकांना 82 टक्के परतावा दिला जातो. तसेच दूध उत्पादकांना अधिकाधिक परतावा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे सांगितले. पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले, “गोकुळ संघामार्फत प्रतिवर्षी दिवाळीस अंतिम दूध दर फरक दिला जातो. त्यानुसार यावर्षी संघाने म्हैस दूधाकरीता ५८ कोटी ९४ लाख ७१ हजार रुपये तर गाय दूधाकरीता २९ कोटी ७१ लाख २० हजार रूपये इतका दूध दर फरक व त्यावरील ६ टक्के प्रमाणे होणारे व्याज ३ कोटी ४८ लाख रुपये व डिंबेचर व्याज ६ टक्के प्रमाणे ४ कोटी ७२ लाख रूपये व शेअर्स भांडवल ४ वर ११ टक्के प्रमाणे डिव्हिडंड ५ कोटी ९८ लाख रूपये असे एकूण १०२ कोटी ८३ लाख रूपये इतकी रक्कम दूध बिलातून दूध संस्थाच्या खात्यावर बॅकेत जमा केली जाणार आहे. सणाच्या अगोदर गोकुळकडून दूध उत्पादक सभासदांसाठी एका अर्थाने ही दिवाळी भेट आहे.’’अशी भावनाही यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ संचालक अरुणकुमार डोंगळे, शशिकांत पाटील चुयेकर, बाळासाहेब खाडे , नावीद मुश्रीफ, सुजित मिणचेकर, अजित नरके, अभिजीत तायशेटे, करणसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, रणजीत पाटील, एस आर पाटील, प्रकाश पाटील, बाबासाहेब चौगुले, प्रा. किसन चौगुले, बयाजी शेळके,अंजना रेडेकर, नंदकुमार डेंगे, युवराज पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, मार्केटिंग विभागाचे हनुमंत पाटील, डॉ. उदयकुमार मोगले डॉ.प्रकाश दळवी आदी उपस्थित होते.