जनप्रतिसाद: कोल्हापूर (प्रतिनिधी)
कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालय यांच्या आदेशानुसार एका खाजगी विमा कंपनीकडून अपघातग्रस्त कुटुंबास तातडीने नुकसान भरपाई देण्याचा दिलासा मिळाला आहे.
कोल्हापुरातील बालिंगा पाडळी गावचा रहिवासी असलेला तरुण विजय विलास पाटील याचा वाहन अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. म्हणून त्याच्या वारसांनी न्यायालयात नुकसान भरपाईची मागणीचा दावा दाखल केला होता. भरपाई मंजूर होऊन ही खाजगी विमा कंपनीने वेळेत कोर्टात रक्कम जमा केली नाही. शेवटी रक्कम वसुलीसाठी दरखास्त दाखल करण्यात आली. यामध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी सदर खाजगी विमा कंपनीची जंगम मालमत्ता जप्त करण्याचा जप्ती वॉरंट पारित केला. या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरिता कोर्टाची बेलीफ या कंपनीत गेले असता विमा कंपनीने तातडीने एन. इ. एफ. टी. द्वारे कोर्टात भरपाईची रक्कम त्वरित जमा केली, सदर विमा कंपनीने स्वतः किंवा त्यांच्या वकिलांमार्फत हजर राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध एकतर्फी काम चालवण्याचे आदेश माननीय न्यायाधीशांनी पारित करून तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे एका नामांकित विमा कंपनीला जप्तीच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले, मात्र कायद्यापुढे नमत सदरच्या विमा कंपनीने रक्कम जमा करून जप्तीची नामुष्की टाळली.
न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे अपघातात ग्रस्त कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.