*सांगली जिल्ह्यातील पटसंख्या २० पेक्षा कमी असलेल्या ३८५ शाळा बंद होण्याच्या मार्गावर--*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
*(अनिल जोशी)*
सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण प्रशासनाने केलेल्या पाहणीत, सुमारे ३८५ शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या असून ,त्या बंद करण्याच्या दृष्टीने शासन पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत सामावून घेऊन, शिक्षकांवरील वेतन खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर पर्यायत्मक विचार चालू आहे. सांगली जिल्ह्यात जवळपास १६८७ जिल्हा परिषदेच्या शाळा असून त्यातील ३८५ प्राथमिक शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थ्यांची पटसंख्या दर्शवत आहे. सर्वसाधारणपणे जिल्ह्यातील २० पटसंख्या खालील सर्व शाळांमध्ये दोन शिक्षक असून, यामध्ये शिराळा तालुक्यात एक पटाची शाळा तर कडेगाव तालुक्यात दोन पटाची शाळा आहे. चारच विद्यार्थी असलेल्या आटपाडी, जत, कवठेमंकाळ, खानापूर तालुक्यात प्रत्येकी एक शाळा असून, त्यामध्ये दोन शिक्षक कार्यरत आहेत. अपवादात्मक स्थितीत जर विद्यार्थ्यांची गैरहजर राहिला तर फक्त शिक्षकांची उपस्थिती राहते ही सध्या अवस्था आहे. सद्य परिस्थितीत दहा किंवा वीस पटसंख्या च्या आतील सर्व शाळा बंद करण्याचे सध्याच्या शासनाच्या शिक्षण विभागाचे धोरण असल्याचे समजते.
दरम्यान २० पटसंख्येपेक्षा कमी असलेल्या शाळांच्या बाबतीत राज्य शासनाकडून अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नसून ,त्यासंबंधीचे धोरण हे शासनाच्या पुढील सूचनेनुसार कार्यवाही केली जाईल असे सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.