*कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे ऊस तोडणीवर परिणाम होण्याची शक्यता---*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
कोल्हापूर जिल्ह्याला गेले काही दिवस ,विविध ठिकाणी अवकाळी पावसाने झोडपले असून, विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील ऊस तोडणीच्या हंगामावर परिणाम होत असल्याचे दिसत आहे. गेले आठवडाभर कोल्हापूरच्या वातावरणामध्ये सातत्याने बदल जाणवत असून ,सध्या वातावरण फारच ढगाळ आहे .सुरुवातीला तीन-चार दिवस थंडी पडल्यानंतर, अचानक वातावरणातील बदलामुळे कोल्हापुरातील वातावरण गेले काही दिवस ढगाळ झाले आहे .आज सायंकाळी सातच्या सुमारास अचानक झालेल्या पावसामुळे, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोराचा पाऊस झाल्याचे वृत्त हाती आले आहे .त्यामुळे अनेक ठिकाणी ऊस तोडणीच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याचे समजते. कोल्हापूर जिल्ह्यातील सिद्धनेर्ली गावासह बामणी ,शेंडूर, शंकरवाडी आदी भागात आज जोरदार पाऊस झाला असून, सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्री आठ पर्यंत सुरू होता. या झालेल्या अचानक पावसामुळे ऊस तोडणी करण्यासाठी आलेल्या मजुरांच्या झोपडपट्ट्यांमध्ये अचानक पाणी शिरल्याने, मजुरांचे हाल झाले असून, काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे .कोल्हापूर जिल्ह्यातील या पावसाने ऊस शेतीच्या शिवारातही पाणी साचले असल्याने, ऊस तोडणीचे काम सध्या बंद राहिले आहे .मात्र रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा व इतर पिकांसाठी या पावसामुळे पोषक वातावरण निर्माण होणार असून, हवेतील गारवा वाढण्यास आणखी मदत होणार आहे.