जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेऊन त्याला प्रदक्षिणा घालणे, यालाच " *गिरनार परिक्रमा* " करणे असेही म्हणतात. पुरातन काळापासून सदर परिक्रमा चालू आहे. गिरनारच्या भोवतीने पुर्ण जंगल आहे. जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखत्यारीत आहे. वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही. फक्त या परिक्रमेच्या कालावधीत ५ दिवस सर्वांसाठी प्रवेश मिळतो. या जंगलात मुंगी, विंचू पासून ते सिंहा पर्यंत भरपूर प्राणी आहेत. पण या ५ दिवसात हे प्राणी आपल्याला काहीही त्रास देत नाहीत. ही दत्तगुरूंचीच कृपा आहे. देव आणि त्यांचे गण हे सुध्दा या कालावधीत परिक्रमेसाठी येतात आणि परिक्रमा करतात अशी आख्यायिका आहे. कळत नकळत घडलेल्या अनेक पापांची मुक्ती ही परिक्रमा केली असता मिळते. त्यामुळे प्रचंड संख्येने भक्त मंडळी ही परिक्रमा करतात. आपल्या सारख्या सामान्य माणसांपासून ते साधू, संत आणि देव सुद्धा ही परिक्रमा करतात. त्यामुळे परिक्रमा करताना या सत्पुरुषांचे दर्शन, आशीर्वाद मिळाल्यास सोने पे सुहागा.
गिरनार परिक्रमेचा मार्ग हा पुर्णपणे जंगलातून जातो. तीन डोंगर चढणे आणि उतरणे. त्यात तीव्र चढ आणि अतीतीव्र उतार असे स्वरूप. रस्त्यात कुठेही धर्मशाळा नाही की कुठे झोपी जाण्यासाठी गादी-उशी. पाणी पिण्यासाठी नळ नाही की खाण्यासाठी हॉटेल. चारी बाजूने घनघोर जंगल, उंच झाडे, झावळ्या, मोठे मोठे वृक्ष या मधून दत्तभक्त परिक्रमा करत असतात. ही परिक्रमा कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या ५ दिवसात करतात. घनदाट जंगलातून जाणारा मार्ग हा काटे-कुटे, दगडे यांनी घेरलेला आहे. परिक्रमा मार्गावर कसल्याही सुविधा नसताना श्रद्धस्तभक्त मंडळी उत्साहाने आणि श्रद्धेने हा मार्ग सोपा बनवितात. परिक्रमेला सुरुवात झाल्यावर १२ किलोमीटरवर जिनाबाबा की मढी हे स्थान येते. मागील शतकात गिरनार येथे जिनाबाबा नावाचे अवलिया होऊन गेले. त्यांची एक चिलीम आहे अद्याप येथे, त्या चिलमीतून ते आत-बाहेर करत होते असे म्हणतात. यांची समाधी व धुनी येथे आहे. येथे परिक्रमावासींसाठी गरमागरम भोजन या संस्थान तर्फे उपलब्ध असते. शेकडो तरुण यासाठी विनामोबदला राबत असतात. थोडे पुढे छोटीसी नदी लागते 'सरनो' नावाची. त्यात बरेच जण स्नान करतात. तेथून पुढे ८ किलोमीटर वर मालवेला हे स्थान लागते. मालवेला येथे आंब्याची अनेक झाडे आहेत. गिरनार पर्वताचा हा मध्यभाग आहे. तेथून पुढे ८ किलोमीटर वर बोरदेवी चे स्थान आहे. अतिशय रमणीय असे हे स्थान आहे. विग्रह आणि मंदिर दोन्ही नितांत सुंदर आहे. परिक्रमेतील शेवटचा टप्पा हा बोरदेवी ते तलेटी हा मार्ग परिक्रमावासीं साठी अतिशय सरळ आहे. तलेटी म्हणजे गिरनार पर्वताच्या पहिल्या पायरीजवळ आल्यावर ही परिक्रमा पूर्ण होते. परिक्रमेचे अंतर एकूण ३८ किमी अंतर आहे. काहीजण पहाटे ५ ला निघून संध्याकाळी ७ पर्यंत पुर्ण करतात, आपल्या चालण्याच्या स्पीडवर अवलंबून आहे तर काहीजण २ दिवसात करतात. स्थानिक भक्तजन ४ दिवस परिक्रमेत असतात. एक रात्र तरी जंगलात मुक्काम आवश्यक आहे म्हणजे परिक्रमा परिपूर्ण होते.
*गिरनार यात्रा व गिरनार परिक्रमेबाबत घायवायची काळजी* .
१) गिरनारला पादुका दर्शनासाठी जाताना पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन महाराजांना शरण जावे आणि म्हणावे कि मला घेवून चला. त्याआधी पहिल्या पायरीजवळील चढवावा मारुतीचे दर्शन घ्यावे व गुरुशिखर चढण्यासाठी शक्ती द्यावी यासाठी प्रार्थना करावी.
२) चालण्यासाठी चांगली चप्पल किंवा बूट घ्यावा (sports sandal उत्तम )आणि त्यावर १०-१५ दिवस चालण्याचा सराव करावा.
३) सॉक्स पायात घातले तर पायात थंडी वाजत नाही.
४) साधारण रात्री ११ वाजता चालायला सुरुवात करावी म्हणजे उन्हाचा त्रास होत नाही व पहाटेच्या प्रसन्न वातावरणात पादुकांचे पुढे नतमस्तक होता येते. अंदाजे ५ तास लागतात.
५) कपडे सुटसुटीत असावे, जीन्स पॅन्ट अथवा नेहेमी घालतो तशी पॅन्ट नसावी.
६) स्वेटर आणि कानटोपीबरोबर असावी साधारण ६००० पायरी नंतर पहाटेचा गार वारा असतो.
७) हातात काठी घ्यावी त्याने चालण्यासाठी मदत मिळते. (३० रुपये दर त्यातील २० रुपये परत मिळतात).
८) पाण्याची बाटली घ्यावी, रस्त्यामध्ये पण मिळते. त्यात electrol पावडर टाकली तर तरतरी येते. electrol पावडर व glucose पावडर प्रत्येकांनी घ्यावे. पहिले ३००० पायऱ्या खुप घाम येतो त्यावेळी खरी गरज भासते.
९) खिशामध्ये खडीसाखर, गोड गोळ्या घेणे.
१०) कमरेला pouch असेल तर उत्तम.
११) सुरवाती पासून वर पादुका पर्यंत कुठेही toilet नाही हे लक्षात ठेवावे.
१२) ज्यांना गुडघेदुखी चा त्रास आहे त्यांनी kneecap ठेवावी, उतरताना त्याचा खूप उपयोग होतो.
१३) रात्री अंधारात चालणे उत्तम त्यामुळे किती चाललो याचा अंदाज येत नाही. (शक्यतो ६/८ ग्रुपमध्ये जावे). चढताना पायऱ्यावर नंबर टाकलेले आहेत त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावे.
१४) प्रत्येकाने बॅटरी जरूर बरोबर घ्यावी, २ जादा सेल बरोबर असावेत. वाटेत लाईट आहेत पण मध्ये मध्ये खूप अंतर आहे.
१५) आपल्यापेक्षा बरेच शारीरिक दृष्ट्या दुर्बळ व वयस्कर लोक गिरनार पर्वत चढतात त्यामुळे महाराजांवर श्रद्धा ठेवावी, विश्वास असेल तर दत्तनाम जप चालू ठेवावा. वेगळी अंतरिकशक्ती मिळते.
१६) ही शर्यत नाही त्यामुळे दम लागला कि बसावे. त्याने चालण्याचा उत्साह अधिक वाढतो. बरोबर च्या लोकांशी थोडी चर्चा करावी, आपला उत्साह वाढतो व श्रम परिहार होतो.
१७) उतरताना हळूहळू उतरावे. घाई केली तर पायात गोळे येतात. उतरताना काठी चा फार उपयोग होतो पायाचा भार थोडा काठीवर टाकावा म्हणजे उतरणे सोपे होते.
१८) जमले तर उतरल्यावर पायाला मालिश करून घ्यावे त्यामुळे थोडा आराम मिळतो. आता ऍक्युप्रेशरचे मशीन घेऊन एक जण बसतात खाली. त्यावर २, ३ मिनिटे उभारल्यावर शरीराला बराच आराम मिळतो.
१९) त्रिपुरी पोर्णिमेच्या चार दिवस आधी गिरनार परिक्रमा असते. वर्षातील फक्त हे चार दिवस forest dept हा जंगलातील रस्ता मोकळा करते. तेव्हा किमान एकदा तरी ही परिक्रमा करावी याला *पौराणिक महत्व* आहे.
श्री गिरनार परिक्रमा हि ३८ km ची ही पायी परिक्रमा असते. हि परिक्रमा फक्त पायी करता येते. डोली वाहन या द्वारे करता येत नाही.
"गिरनार" हे क्षेत्र जुनागड च्या पायथ्याशी असून, सौराष्ट्र गुजरात या राज्यात येते. जुनागढ या शहरापासून हे स्थान दोन किलोमीटर अंतरावर आहे. सदरहू गिरनार परिक्रमेतील माहिती, विविध लेखातील संदर्भातून संकलित करून, दत्त भक्तांच्याहितार्थ व जनहितार्थ प्रसारित करण्यात आली आहे.