*कोल्हापुरात ग्रामीण भागात डॉक्टरांचे वैद्यकीय नोंदणी प्रमाणपत्र व पदवी प्रमाणपत्र ग्राह्य असल्याची खात्री केल्यावरच दवाखाना सुरू करण्यास परवानगी देणार- जिल्हाधिकारी राहुल रेखावार.*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात, सध्या बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी ,ग्रामपंचायत स्तरावर कोणताही खाजगी दवाखाना किंवा खाजगी वैद्यकीय व्यवसाय सुरू करावेसे असल्यास, संबंधित डॉक्टरांचे वैद्यकीय व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र व पदवी प्रमाणपत्र याची खात्री केल्याशिवाय, दवाखाना चालू करता येणार नाही. याबाबतीत संबंधित ग्रामसेवक व स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाने स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून, सदरहू संबंधित डॉक्टरांचे प्रमाणपत्रे ग्राह्य असल्याची खात्री करून घेऊन, मगच नवीन दवाखाना अथवा खाजगी वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी सूचना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली, नुकतीच जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर चौकशी समितीची सभा संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर चौकशी समितीच्या सभेस सदस्य सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक प्रतिनिधी एडवोकेट गौरी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा परिषद मुख्यालय दवाखानाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातून उपलब्ध झालेल्या प्राप्त माहितीनुसार, 17 बोगस डॉक्टरांच्यावर कारवाई करण्यात आली असून, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सदरहू बाबतीत समाधान व्यक्त केले ,शिवाय बोगस डॉक्टरांची शोध मोहीम यापुढे आणखीन आणखी तीव्र व कडक करून, बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन, तात्काळ संबंधित बोगस डॉक्टरांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्याची सूचना त्यांनी सर्व समिती सदस्यांना केली. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे वैद्यकीय नोंदणी प्रमाणपत्र व पदवी प्रमाणपत्र तपासून, त्याचा अहवाल गटविकास अधिकारी तथा अध्यक्ष तालुकास्तरीय बोगस डॉक्टर चौकशी समिती पंचायत समिती यांनी, जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर चौकशी समितीला, पंधरा दिवसात सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिले आहेत.