*सांगलीतील जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा, गोवर विषाणू रोगाच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी हाय अलर्ट मोडवर---*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गोवर विषाणूंच्या रोगाचा प्रसार झाला असून, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या आदेशानुसार ,सांगली जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी हाय अलर्ट मोडवर आला आहे. सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात व शहरी भागात असे मिळून 32 बालकांच्या अंगावर गोवर सदृश्य पुरळ आढळून आले होते, परंतु संबंधित सर्व रुग्णांच्या रक्तांचे नमुने घेऊन मुंबईला पाठविले होते. मुंबईहून प्राप्त झालेल्या अहवालानुसार गोवरची लागण झाली नसल्याचे सिद्ध झाले आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप माने यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार गोवर या रोगाच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरण राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील ऊसतोड, वीट भट्टी, भटके, झोपडपट्टी, डोंगराळ आदी भागात कामासाठी असलेल्या मजुरांच्या ठिकाणी सर्वे करून, जवळपास 373 बालकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी असे सांगितले आहे कि- संशयित रुग्णांच्या संपर्कात जाणे टाळावे, हात साबणाने वारंवार धुवून, फळे, हिरव्या- पालेभाज्या खाऊन ,लसीकरण केल्यास संबंधित गोवर रोगावर मात करता येते, तसेच जिल्ह्यातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायकानी गोवर सदृश्य रुग्ण आढळल्यास, त्याची माहिती त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्राशी अथवा आरोग्य संस्थेला द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. सांगली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ही हाय अलर्ट मोडवर ठेवण्यात आली असून ,गोवर सदृश्य लक्षणे मुलांमध्ये आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला किंवा संपर्क करावा असे आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजादया निधी यांनी केले आहे.