*जल्लोषी रॅलीने फरहान मकानदारचे कोल्हापूरात स्वागत...!*
कोल्हापूर प्रतिनिधी:मिलिंद पाटील.
संरक्षण मंत्रालय आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालय यांच्या वतीने घेण्यात आलेल्या वीरगाथा प्रोजेक्ट 2.0 मध्ये देशभरातील पंचवीस लाख विद्यार्थ्यांमधून सुपर 25 मध्ये स्थान पटकावणा-या कोल्हापूरच्या फरहान मकानदारची शहरात जल्लोषी रॅली काढून स्वागत करण्यात आले. सैनिकी आणि राष्ट्रपुरुषांच्या वेशातील चारशेहून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या सवंगड्याच्या कौतूकासाठी या रॅलीत नोंदवलेला सहभाग शहरात चर्चेचा विषय ठरला..
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उंचगांव (ता. करवीर) येथील नॅशनल ॲकॅडमी या शाळेचा विद्यार्थी असलेल्या फरहानचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यानंतर कोल्हापूरात आलेल्या फरहानचे नॅशनल ॲकॅडमीच्या वतीने भव्य रॅली काढून जल्लोषी स्वागत करण्यात आले.
दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून या रॅलीचा शुभारंभ झाला. शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, नॅशनल ॲकॅडमीचे चेअरमन हाजी असलम सय्यद, व्हाइस चेअरमन राहीद खान, संचालक नासर खान यांच्या हस्ते तर मुस्लिम बोर्डिंगच्या वतीने चेअरमन गणी आजरेकर प्रशासक कादर मलबारी, नेहरू हायस्कूलचे मुख्याध्यापक अस्लम काझी यांच्या हस्ते फरहानचा गौरव करण्यात आला, त्यानंतर, सजवलेल्या ट्रॉलीत फरहानला उभे करुन रैलीचा प्रारंभ झाला त्याच्यासोबत ट्रॉलीत छत्रपती शिवराय, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, ए. पी. जे. अब्दुल कलाम, सुभाषचंद्र बोस, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, अशा राष्ट्रपुरुषांसह स्वातंंत्र्यसैनिकांच्या वेशभूषेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. दसरा चौक, आईसाहेब महाराज पुतळा मार्गे बिंदू चौकात ही रॅली आली. तेथे राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून ही रॅली शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर फटाके फोडून फरहानचे स्वागत झाले. छत्रपती शिवरायांना अभिवादन करून ईब्राहीम खाटीक चौकात या शैलीचा समारोप झाला. शाळेचे जवळपास साडेचारशेहून अधिक विद्यार्थी आणि एन.सी.सी. कॅडेटस् या रैलीत सहभागी झाले होते. रॅलीचे संयोजन इक्बाल शेख, कौसर मुल्ला, आल्फीया सनदी, अली अनवर जमादार, साहील मुजावर, इम्रान जमादार, शबाना शेख, अर्शद शेख, सैफ मुजावर, राबिया मकानदार, रूमान गवंडी आदीं नी केले.