राज्य बॉक्सिंग स्पर्धेत "तन्मय"ला "गोल्ड".!!
- चंद्रपूर येथे पार पडल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा.
- सलग चौथे सुवर्णपदक.
कोल्हापूर : (जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.)
न.वा.व. स्वावलंबी विद्यालय येथे इयत्ता 11वी मध्ये शिकणाऱ्या व बॉक्सिंग क्रीडा प्रबोधिनी अकोला येथे प्रशिक्षण घेत असलेल्या तन्मय सचिन कळंत्रे याने चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून यश संपादन केले. यशस्वी खेळाडूंचा स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
- राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी निवड.
या स्पर्धेतील सुवर्ण कामगिरीची दखल घेऊन त्याची राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याने मिळवलेल्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
- सलग चार पदकांची कमाई.
तन्मयने यापूर्वीही राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली असून यंदाच्या पदकासह त्याने सलग चार पदके मिळवून स्पर्धेतील दबदबा कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. मुंबई, सांगली, औरंगाबाद या ठिकाणी पदकांची कमाई करून चंद्रपूर येथील स्पर्धेतही सुवर्ण कामगिरी करून सलग चार सुवर्णपदकाची आपल्या खात्यात भर टाकली आहे. सरावात सातत्य व कठोर परिश्रम या जोरावर त्याने हे सुवर्ण पदक पटकावले आहे.
- एकूण 13 गटांमध्ये स्पर्धा.
तन्मय च्या गटामध्ये एकूण नऊ खेळाडू होते. प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारत त्यांनी सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. स्पर्धेत एकूण 100 पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. एकूण 13 विविध गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या.
-पंधरा सुवर्णपदकांची कमाई.
बॉक्सिंग क्रीडा प्रबोधिनी अकोला च्या खेळाडूंनी राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत वर्चस्व राखत एकूण 15 सुवर्णपदकांचे लयलूट केली. या सुवर्ण कामगिरीमुळे क्रीडा प्रबोधनी चा नावलौकिक राज्य पातळीवर पोहोचला आहे. आणि क्रीडा प्रबोधिनी खेळाडू मध्ये जल्लोषाचे वातावरण पसरले आहे.
- यांचे लाभले मार्गदर्शन.
न. वा. व. स्वावलंबी विद्यालय अकोला इयत्ता अकरावी मध्ये शिकणाऱ्या तन्मयला प्रशिक्षक सतीशचंद्र भट्ट, गजानन कबीर, सय्यद साद, आदित्य माने यांचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन लाभले. तसेच वेळोवेळी वडील सचिन व आई वैशाली यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांचे प्रोत्साहन मिळाले.