निसर्गाशी एकरूप राहणे हेच जीवन आहे. निसर्गातील घटकांना आपलेसे मानले तर जीवन सुखमय होईल, असे मत कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी आज केले.
गगनवाबडा येथील वेसरफ येथे आजरी उद्योग समूहाच्या वतीने उभारण्यात आलेल्या आजरीज इको व्हॅलीचे उदघाटन स्वामींच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
स्वामीजी पुढे म्हणाले, देशाच्या सात पर्वतीय रांगांमध्ये सह्यादी पर्वतरांग सर्वांत श्रीमंत आहे. कारण येथील वनस्पती, पक्षी, जंगली प्राणी अशी विपुल प्रमाणात जैवविविधता आहे. त्यामुळे वातावरण संतुलित राहण्यास मदत होते. मन आणि वन नेहमीच सुरक्षित राहायला हवे. मात्र मानवाचा असा समज आहे की, सर्व काही माझ्यासाठीच आहे. त्यामुळे तो सर्वांवर अतिक्रमण करू लागला. सुंदर स्वर्ग तो निर्माण करू शकेल, असे त्याला वाटू लागले आणि त्यातून पंचमहाभूतांच्याही नुकसानीस जबाबदार ठरला.
डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय पाटील म्हणाले, येथे उभारलेल्या साखर कारखान्यामुळे आज येथील युवकांना रोजगार मिळाला, तसेच आजरीच इको व्हॅलीच्या माध्यमातून येथील जैवविविधतेचे जतन तर होईलच शिवाय ती समाजासमोर येईल. अशा प्रकारचे आणखी येथे प्रकल्प झाल्यास परिसराचा कायापालट होण्यास वेळ लागणार आहे.
शेखर आजरी यांनी प्रास्ताविकात आजरीज इको व्हॅलीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, पश्चिम घाटापैकी गगनबावडामध्ये निसर्गाने भरभरून दिले आहे. येथील दाट जंगलामध्ये औषधी वनस्पतीही विपुल प्रमाणात आहेत. त्याच दृष्टीने वेसरफ येथे ४० वर्षांच्या अथक परिश्रमातून आजरीज इको व्हॅली, या नावे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले अग्रो टुरिझम सेंटर उभारले आहे. दहा एकरामध्ये विस्तारलेल्या व इको फ्रेंडली असणाऱ्या या सेंटरमध्ये १५ अडव्हेंचर प्रकार आहेत. पुढे पुढे त्याचा विस्तार करू. येथील आहार हा पूर्ण शाकाहारी असेल. विजय पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
डॉ. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अशोक रोकडे यांनी आभार मानले.