प्रतिनिधी : शैलेश माने
कोल्हापूर, ता. ३१ – महावीर जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती अध्यक्ष नरेंद्र ओसवाल व कांतिलाल संघवी (केजी) यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, श्री संभवनाथ जैन श्वेतांबर ट्रस्ट, गुजरी व मुनीश्वर सुरत स्वामी जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट, लक्ष्मीपुरीच्या वतीने संयुक्त कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यानुसार प्रमुख कार्यक्रम म्हणजे सकाळी नऊ वाजता श्री महावीर स्वामी जन्मकल्याणक मिरवणूक काढण्यात येईल. गुजरी येथून सुरू होणारी मिरवणूक भेंडे गल्ली, छत्रपती शिवाजी पुतळा, लुगडी ओळ, लक्ष्मीपुरी मंदिर, बिंदू चौक ते पुन्हा गुजरी येथे समाप्त होईल.त्यांनी सांगितले की, मिरवणुकीपूर्वी गुजरी येथे आचार्य भगवंत आचार्य अजित शेखर सुरीश्वरजी महाराज, आचार्य विमलबोधी सुरीश्वरजी महाराज यांचे मार्गदर्शन होईल तर लक्ष्मीपुरी येथे आचार्य पन्यास सम्यक दर्शन यांचे मार्गदर्शन होईल.
सकाळी ११.३० वाजता महाप्रसादाचे वाटप मंदिरांमध्ये होईल. त्यानंतर दुपारी इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शहरवासियांनी महावीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन या दोघांबरोबर दोन्ही मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.