जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी दत्तक्षेत्रास व कोथळी येथील कल्लेश्वर मंदिरासाठी अनुक्रमे 3 कोटी रुपयांचा व 2 कोटी रुपयांचा निधी, प्रादेशिक पर्यटन विकास योजना 2022 -23 अंतर्गत, शासनाने मंजूर केला असल्याची माहिती माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे.
शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजना 2022 - 23 अंतर्गत नृसिंहवाडी दत्तक्षेत्र येथे व कोथळीच्या कल्लेश्वर मंदिर येथे, सदरहू निधीचा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वापर करण्याचा असून, महाराष्ट्रातील असंख्य दत्त भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी दत्तक्षेत्रास, व कोथळीच्या कल्लेश्वर मंदिराच्या तीर्थक्षेत्रास मंजूर झालेल्या एकूण 5 कोटी रुपयांच्या निधीमुळे, तीर्थस्थळांच्या वैभवात भर पडणार आहे. सदरहू तीर्थक्षेंत्राना प्रादेशिक पर्यटन विकास योजना 2022 -23 अंतर्गत मंजूर केलेल्या निधी बद्दल, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा व राज्य मंत्रिमंडळाचे आभार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केले आहेत .
कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी दत्तक्षेत्रास मंजूर झालेल्या 3 कोटी रुपयांच्या निधी अंतर्गत, यात्री निवास व पार्किंग जवळ दुकान गाळे बांधण्यासाठी 1 कोटी रुपये, गेस्ट हाऊस जवळ यात्री निवास बांधण्यासाठी 70 लाख रुपये, जोशी भोजनालय जवळ काँक्रीटीकरण व चार चाकी पार्किंगसाठी 80 लाख रुपये ,माहेश्वरी मंगल कार्यालयाजवळ मोटरसायकल पार्किंग साठी 50 लाख निधी असा एकूण 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे .कोथळी येथील कल्लेश्वर मंदिरातील कामांमध्ये ,सभागृह मंदिर परिसरात दुकान गाळे साठी 30 लाख रुपये ,मंदिराचे सुशोभीकरण करण्यासाठी 50 लाख रुपये ,मंदिर भागात रस्ते काँक्रिटीकरण करण्यासाठी 60 लाख रुपये, भक्तनिवास व अंडरग्राउंड गटार बांधण्यासाठी अनुक्रमे प्रत्येकी 30 लाख रुपये असा एकूण 2 कोटी रुपयांचा निधी, विकास कामाच्या पायाभूत सुविधा साठी मंजूर झाला आहे .वरील दोन्हीही तीर्थक्षेत्रांच्या पायाभूत विकास कामांच्यासाठी लवकरच निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार शेवटी दिली आहे.