जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 97 वे ,जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे आयोजित करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समितीस प्राप्त झालेल्या 4 स्थळातून, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या बैठकीत रविवारी अखेर, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यावर शिक्कामोर्तब झाले. आज साहित्य मंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्वला मेहंदळे यांनी, प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. दरम्यान सातारा, औदुंबर, अमळनेर, जालना या चार स्थळांची निमंत्रणे, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाला प्राप्त झाली होती.
अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ निवड समितीने औदुंबर व अमळनेर या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शिवाय सातारा येथील संस्थेचे सादरीकरण पाहून, 4 संस्थांच्या स्थळांची आयोजनाची तयारी व कार्यक्षमता लक्षात घेऊन, सर्व संमतीने अमळनेर येथील मराठी वाङ्मय मंडळ या संस्थेची शिफारस करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे 1952 साली संमेलन झाले होते. त्यानंतर आता 72 वर्षानंतर, साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या ठिकाणी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 97वे होत आहे याचा सर्वांना अभिमान असून संमेलन यशस्वी करण्यासाठी, व्यवस्थित नियोजन करून पार पाडू असे डॉ. अविनाश जोशी अध्यक्ष, मराठी वांग्मय मंडळ अमळनेर यांनी सांगितले आहे. दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन निवड समितीत महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक उषा तांबे व कोषाध्यक्ष प्रकाश पागे यांचा समावेश होता, परंतु प्रकृतीच्या कारणास्तव स्थळ पाहणीच्या वेळी ते, उपस्थित राहू शकले नाहीत. बहुतांशू निवड समितीच्या सदस्यांच्या मते अध्यक्षांनी तरी स्थळांची पाहणी करणे आवश्यक आहे असा मतप्रवाह होता. एकंदरीत आता या सर्व गोष्टीवर पडदा पडून, आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 97 वे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे आयोजित करण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.