जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठासमोर, अटीतटीच्या झालेल्या युक्तिवादानंतर ,दि.16 मार्च 2023 रोजी सुनावणी पूर्ण झाली होती.त्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाने राखून ठेवला होता. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठासमोर सुनावणीच्या दरम्यान झालेल्या अटीतटीच्या युक्तीवादावर, देशातील कायदे तज्ञांमध्ये व राजकारणातील वातावरणात चर्चेला उधाण आले होते .आता मात्र महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाच्या निकालाकडे, संपूर्ण देशाचे व राज्याचे लक्ष लागले आहे.
आजपर्यंत सर्वोच्च न्यायालयातील घटनापिठासमोर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, सुमारे 1 महिन्याच्या आत निकाल लागतो परंतु तसे कोणतेही बंधन नाही.16 एप्रिल 2023 ला एक महिना पूर्ण होत असल्याने, कोणत्याही दिवशी निकाल जाहीर करण्यात येईल अशी शक्यता आहे . सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती एम.आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती पी. नरसिंह यांचा समावेश होता. त्यातील एक न्यायमूर्ती एम. आर. शहा हे दिनांक 15 मे 2023 रोजी सेवानिवृत्त होणार असल्याने, शिवाय घटनापिठासमोर सुनावणी पूर्ण झाली असल्याने, त्यांच्या सेवानिवृत्त होण्याच्या दिवसाच्या अलीकडे सुनावणी चा निकाल लागणे ,संकेतानुसार अपेक्षित आहे. दरम्यान 20 मे 2023 पासून 2 जुलै 2023 पर्यंत सर्वोच्च न्यायालयास उन्हाळी सुट्टी असल्याने, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निकाल कधीही लागण्याची शक्यता आहे असे कायदे तज्ञांचे मत आहे.