जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी)महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कोणतेही मतभेद नसल्याची ग्वाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. मात्र सर्व विरोधी पक्ष यांनी अदानी प्रकरणात, जर संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीचा आग्रह केला व विरोधकांची भूमिका एकच राहिल्यास, आपण पाठिंबा देऊ असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना, पत्रकारांशी संवाद साधत होते.
महाराष्ट्र राज्यातील सध्याचे सरकार अपयशी ठरले असून, राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवणुकीचे प्रयत्न प्राधान्याने करायला पाहिजे होते. सध्या देशातील व राज्यातील महागाई, बेरोजगारी यासारखे अनेक प्रश्न जनतेसमोर 'आ' वासून उभे असून, प्राधान्याने या सर्वावर विचार करण्याची व मार्ग काढण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. राज्यातील सध्याचे राजकीय वातावरण हे सध्या वेगळ्याच दिशेने जात असून, राज्यातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.