जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )कोल्हापुरातील दख्खनचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या व महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत असलेल्या ,जोतिबाचा यात्रेचा आजचा मुख्य दिवस असून, आज सुमारे 2 लाख भक्त भाविक हजर झाले असून, सुमारे 10 लाखाच्या आसपास भाविक यात्रेला येतील असा अंदाज आहे. आज दख्खनचा राजा असलेल्या जोतिबा डोंगरावर " जोतिबाच्या नावानं चांगभलं", "जोतिबाच्या नावानं चांगभलं " याच्या गजरासह, गुलाल- खोबऱ्याची भक्त भाविक उधळण करतील. आजच्या यात्रेच्या मुख्य दिवसाच्या पूर्वसंध्येला, सुमारे 2 लाख भक्त भाविक दाखल झाले आहेत .
कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाट ,उशिरे, पोहाळे, निगवे, दाणेवाडी ,गिरोली, वडणगे आदी भागातील रस्ते भक्त भाविकांच्या प्रचंड संख्येने भरलेले चित्र पहावयास मिळत होते .जिकडे पहावे तिकडे हलगी -सनई- पिपाणीच्या सुरामध्ये ,सासनकाठ्या नाचत डोंगराकडे जात असल्याचे दिसत होते. यात्रेसाठी दानशूर लोकांनी भक्त भाविकांना, पिण्याचे पाणी, चहा ,नाश्ता ,प्रसादाची व्यवस्था केली होती .महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून दरवर्षीप्रमाणे मानाच्या 108 शासनकाठ्या दाखल झाल्या आहेत. या सर्वांचे स्वागत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, अधीक्षक दीपक मेहकर व इतर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी मानाचा विडा देऊन केले आहे. आज मंदिराच्या परिसरात व डोंगराच्या परिसरात, "जोतिबाच्या नावानं चांगभलं", "जोतिबाच्या नावानं चांगभलं" असा गजर करीत असून ,गुलाल- खोबऱ्याची उधळण मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचे दिसत होते. दिवसभर डोंगरावर भक्त भाविकांच्या झुंडीच्या झुंडी दिसत होत्या. दरम्यान मंदिरातील नित्य होणारे कार्यक्रम पहाटे 4:00 वाजता घंटानाद ,पहाटे 4:00 ते 5:00 श्रींची पाद्यपूजा- काकड आरती ,सकाळी 6:00 वाजता शासकीय महापूजा,8: 00 वाजता जोतिबा देवाची राजेशाही महापूजा, 9:00 ते 11:00 मंदिर दर्शनास खुले, दुपारी 12:00 वाजता धूपारती 1:00 वाजता पालकमंत्र्यांच्या हस्ते शासन काठ्यांची मिरवणूक व आज संध्याकाळी 5:30 वाजता पालखी सोहळा साजरा होणार आहे.