जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगलीत आज महाराष्ट्र शासनाच्या, रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळावर म्हणजेच सेन्सॉर बोर्डावर, मुकुंद पटवर्धन यांची तीन वर्षासाठी सदस्य म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळ म्हणजेच sensor board यावर सांगली जिल्ह्यातून पुढील तीन वर्षासाठी मुकुंद पटवर्धन यांची निवड झालेली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या नाटक अनुदान समितीवर सुद्धा त्यांनी काम केले आहे. सलग दोन टर्म ते या कमिटीवर काम करत होते. तसेच यावर्षी झालेल्या नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबईच्या निवडणुकीत सांगली जिल्ह्यातून सर्वाधिक मतांनी ते विजयी झाले आहेत. सलग दुसऱ्यांदा नियामक मंडळ सदस्य म्हणून निवडून गेलेले ते सांगलीतील पहिलेच उमेदवार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वृद्ध कलाकार मानधन समितीवर सुद्धा त्यांनी काम केलेले आहे. रंगभूमीवर गेली 35 वर्षे ते सतत कार्यरत आहेत. सुमारे 1500 प्रयोगात प्रत्यक्ष सहभाग. यामध्ये दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, प्रकाश योजना या सर्वांचा समावेश आहे. गद्य नाट्य प्रयोगाप्रमाणेच संगीत रंगभूमीवर मत्स्यगंधा, संशयकल्लोळ, मंदारमाला, कट्यार काळजात घुसली इत्यादी प्रयोगांचे सादरीकरण करत करत संगीत ययाती आणि देवयानी या नाटकाचे महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर मिळून 25 प्रयोग त्यांनी सादर केले.
महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धेबरोबरच दिल्लीच्या बृहन महाराष्ट्र स्पर्धेतही त्यांना अनेक पारितोषिके मिळालेली आहेत. पु.भा. भावे समितीचा नाट्यसेवा पुरस्कार, नाट्य परिषद पुणे शाखेचा सर्वोत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक पुरस्कार हे विशेष पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. हौशी कलाकार ते सेन्सॉर सदस्य असा त्यांचा प्रवास यशस्वीपणे सुरू आहे.