जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
दिल्लीत आज नीती आयोगाची बैठक बोलावण्यात आलेली असून, या बैठकीस राज्याचे सर्व मुख्यमंत्री व केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल हे सहभागी होणार असले तरी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ,पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम .के. स्टॅलीन ,पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान ,बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. आर यांनी बैठकीवर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान केंद्र व राज्यातील सरकारे यांच्या असलेल्या संघर्षामुळे सध्याचे चित्र उभा झालेले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बैठकीवर प्रथम बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य करत नसतील, तर सामान्य लोकांनी कोणाकडे जायचे ?असा रोखठोक सवाल दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केला आहे. आज सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत प्रगती मैदानात ही बैठक होणार असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील बैठकीला उपस्थित राहण्यासाठी, दिल्लीत दाखल झाले आहेत. दरम्यान नीती आयोगाच्या बैठकीत पायाभूत सुविधा, गुंतवणूक कौशल्य विकास आणि सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, महिला सक्षमीकरण ,आरोग्य विषयक सुधारणा, एम एस एम इ आदी विषयांवर चर्चेचा जोर राहील. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीतील नीती आयोगाच्या बैठकीत, विकसित भारत घडवण्याच्या गोष्टीवर भर देऊन मुख्यत्वे चर्चा करण्यात येईल.