जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव वांद्रे- वर्सोवा सागरी महामार्गाला देण्याची घोषणा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याचा गौरव म्हणून, वांद्रे -वर्सोवा सागरी महामार्गाला, " स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे- वर्सोवा सागरी सेतू "असे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केली आहे. केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या शौर्य पुरस्काराच्या धर्तीवर, राज्यातील विशेष शौर्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस, स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार,राज्य शासनातर्फे प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणाही आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 140 व्या जयंतीनिमित्त, स्वातंत्र्यवीर गौरव दिन, महाराष्ट्र शासनातर्फे सर्वत्र साजरा केला जात असून, दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित शतजन्म शोधताना या भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे, महाराष्ट्र शासनातर्फे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षी महाराष्ट्र सदनामध्ये देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती साजरी करण्यात आली असून, नवीन संसद भवनाचे उद्घाटन देखील भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त केले आहे .या गोष्टीचा आम्हाला अभिमान असून, ही बाब अभिमानास्पद आहे शिवाय या ऐतिहासिक सोहळ्यास आम्ही उपस्थित होतो ही एक अवर्णनीय गोष्ट होय. लोकशाहीतील पवित्र मंदिराची असलेल्या नव्या संसद भवनाची वास्तू, ही अत्यंत कमी वेळेत झालेली वास्तू स्थापना असून, ही एक आमच्या देशाच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे.