जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(मिलिंद पाटील.)
पुणे बेंगलोर महामार्गावर किणी टोल नाका व घुणकी फाट्यादरम्यान सकाळी ६-००वाजता रस्त्याकडेने चाललेल्या रोडरोलर ला इर्टिका गाडीने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ०२ जण जागीच ठार, तर ०४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. (राहुल अशोक शिखरे वय-३० रा. मिणचे) व (सुयोग दत्तात्रय पवार वय २८ रा. टोप) अशी अपघातामध्ये ठार झालेल्या मयत व्यक्तींची नावे आहेत. तर सुमित कुरणे वय-२४, वैभव चौगुले वय-२३, रा. टोप, अनिकेत जाधव वय- २२, निखिल शिखरे वय-२७ व राहुल शिखरे वय-३० सर्व रा. मिणचे हे सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, टोप व मिणचे गावातील काही युवक प्रदर्शन पाहण्यासाठी मुंबई येथे गेले होते. प्रदर्शन पाहून रात्री ११-३० वाजता ते मुंबईतून इर्टिका गाडी क्रमांक एम. एच. ४८ एके- ६५४५ ने घरी परतण्यासाठी निघाले. पण पहाटे सहाच्या दरम्यान घुणकी फाट्याजवळ किणी टोलनाक्याच्या दिशेने चाललेल्या रोड रोलरला इर्टिका गाडीने पाठीमागून जोराची धडक दिली. हि धडक एवढी जोरात होते की, इर्टिका गाडीच्या धडकेने रोड रोलर रस्त्याच्या खाली पलटी झाला. तर इर्टिका गाडीचा पुढच्या भागाचा पूर्ण चक्काचूर होऊन गाडीचे तोंड पुण्याच्या दिशेला झाले होते. ही धडक होताच महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. अपघात होताच महामार्गावरील प्रवाशांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. व अपघात ग्रस्त व्यक्तींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातस्थळी अपघातग्रस्तांचे ओरडणे अंगावर शहारे आणणारे होते. तर रोलर चे चालक दादासो दबडे वय-४० यांना देखील हायवे पेट्रोलिंगच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दाखल करण्यात आले. शासकीय रुग्णालयांत दाखल करण्यात आलेल्यांपैकी सूयोग पवार व राहुल शिखरे यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघातामुळे टोप व मिणचे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मयत व्यक्तींच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.