जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीमध्ये, आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीसाठी, राज्यातील जागा वाटपाबाबत कोणतेही मतभेद नसल्याची ग्वाही, राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी दिली आहे. कर्नाटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर ,महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र बसून ,आगामी लोकसभा व विधानसभेकच्या जागा वाटपावर चर्चा करून निर्णय घेणार असून, याबाबतीत कुठलेही मतभेद नसल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांनी आज पंढरपूर येथे वार्ताहरांशी बोलताना केले. दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एक वाक्यता असून, आगामी लोकसभेच्या व विधानसभेच्या जागा वाटपाबाबत, विधानसभा मतदारसंघनिहाय चर्चा करून ,या सर्व गोष्टींवर निश्चितच मार्ग काढू .राज्यात महाविकास आघाडीने, गेले 3 वर्षातील झालेल्या निवडणुकीत, भाजपला धूळ चारत मोठे यश संपादन केले आहे .दरम्यान सोलापूर लोकसभेची जागा ही काँग्रेसची असून, अनेक वर्षांपासून काँग्रेसचा उमेदवार येथून निवडणूक लढवीत आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेस पक्षाकडेच असेल असे संकेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी दिले.