जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
ओडिशा राज्यातील बालासोर इथल्या बहानगा रेल्वे स्थानकावर काल झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 288 च्या वर झाली असून, गंभीर जखमींची संख्या सुमारे 803 झाली आहे असे रेल्वे प्रशासनाच्या ताज्या आकडेवारीत म्हटले आहे. दक्षिण पूर्व रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बचाव कार्य पूर्ण झाले असून, अद्यापही काही मृतदेहांची ओळख पटलेली नसून, ओळख पटविण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. ओळख पटलेल्या मृतांचे देह संबंधित नातेवाईकांच्याकडे, सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून, देण्यात येत आहेत असे ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप सेना यांनी सांगितले आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मृतांच्या वारसांना, 10 लाख रुपये तसेच गंभीर जखमीना 2 लाख रुपये व किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे .केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अपघाताची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार असून, रेल्वे सुरक्षा आयुक्त या संपूर्ण रेल्वे अपघाताच्या घटनेची स्वतंत्रपणे चौकशी करणार आहेत. गेल्या 15 वर्षातील हा फार मोठा भीषण अपघात असून ,त्याचे कारण समजणे आवश्यक आहे. दरम्यान कोरोमंगल एक्सप्रेस मध्ये अडकलेल्या 250 प्रवाशांना घेऊन एक विशेष रेल्वे ,आज भद्रक येथून चेन्नईला रवाना झाली असून, उद्या सकाळपर्यंत चेन्नईला पोहोचेल. काल झालेल्या रेल्वे अपघातामुळे रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून ,रेल्वे प्रवाशांच्या मध्ये भयावह भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.