जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
महाराष्ट्र शासनाच्या वतीने यंदाच्या आषाढी एकादशीच्या सोहळ्याच्या निमित्ताने, दिंडी मधल्या सर्व वारकऱ्यांना, आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून, आरोग्य विभागाच्या वतीने ,'आरोग्याची वारी पंढरपूरच्या दारी" हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केले आहे. मुंबईमध्ये आज ते वार्ताहराशी बोलत होते .यंदा वारकरी आषाढी एकादशीस पंढरपूरला पोहोचल्यानंतर ,प्रत्येक वारकऱ्यांची आरोग्य तपासणी व्यवस्थित व्हावी, आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सुविधा व्यवस्थित मिळावी हा या कार्यक्रमाच्या उद्देश असल्याचे प्रतिपादन आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केले.
पंढरपूरला दिंडी मार्गस्थ झाल्यानंतर ,प्रत्येक दिंडी सोबत दोन किलोमीटरच्या अंतरावर एक आरोग्य पथक कार्यरत असणार असून ,त्यामध्ये आरोग्य दूताचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने यंदाच्या आषाढी एकादशीच्या दिंडीच्या सोहळ्यामध्ये जवळपास 127 आरोग्य पथकांची संख्या कार्यरत असून, आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्या पालखीच्या मार्गावर, आरोग्यपथके, औषध उपचाराची सोय ,तात्पुरते दवाखाने हे सर्वत्र उभारले गेले आहेत. यंदाच्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत 4 रुग्णवाहिका व अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी 75 शासकीय रुग्णवाहिका पालखीसोबत कार्यरत राहणार आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी दिली .महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने, तालुक्याच्या उपकेंद्रापासून ते जिल्ह्याच्या रुग्णालयापर्यंत, प्रत्येक शनिवारी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त दि. 27,28 व 29 जून 2023 रोजी, महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर वाखरी, गोपाळपूर आदी ठिकाणी आयोजित केले जाणार आहे. या महाआरोग्य शिबिरासाठी आरोग्य विभागातर्फे जवळपास 9000 डॉक्टर व इतर मेडिकल कर्मचारी सहभागी होणार असून, या सर्वांची सेवा मोफत असणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिली.