जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगलीतील नामांकित असलेल्या गुरुवर्य वासुदेव केशव सावईकर प्राथमिक शाळेमध्ये आज, सिटी हायस्कूल सांगली येथील 1996 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या सेवाध्यास फाउंडेशनच्या माध्यमातून, शाळेतील 32 विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.यावेळी सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव आनंदराव (काका) पाटील, सेवाध्यास फाउंडेशनचे अध्यक्ष अमेय फाळके, सेक्रेटरी विजय निकम, विठ्ठल सावईकर, शाळेचे मुख्याध्यापक अरविंद गावडे उपस्थित होते.
शिक्षणापासून वंचित व उपेक्षित असलेल्या समाजातील विद्यार्थ्यांना आज खऱ्या अर्थाने मदत करण्याचे स्वप्न, 1996 सिटी हायस्कूल सांगलीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या सेवाध्यास फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकले. सांगलीत कोरोना काळापासून आज तागायत,विविध उपक्रम सेवाध्यास फाउंडेशन तर्फे राबवले जात असून, या सर्व कार्यक्रमांना सिटी स्कूल सांगली मधील 1996 बँकेच्या माजी विद्यार्थ्यांचे फार मोठे अमौलिक सहाय्य लाभले आहे. सांगली जिल्ह्यातील बऱ्याच निराधार वृद्ध स्त्रियांना देखील आज, धान्याच्या स्वरूपात ,औषधाच्या स्वरूपात मदत, सेवाध्यास फाउंडेशन च्या माध्यमातून होत आहे. विविध समाजातील गरीब अनाथ मुला- मुलींना शैक्षणिक फीची मदत, वह्या पुस्तकांसाठी मदत व इतर शालेय मदतीसाठी, सेवाध्यास फाउंडेशनचे सदस्यांचे कार्य गेली काही वर्षे चालू आहे. सांगली जिल्ह्यातील निराधार वृद्ध व्यक्तींना वेळोवेळी, औषधांसाठी पैशाची मदतही सेवा ध्यास फाउंडेशन तर्फे चालू आहे. आज नावारूपास आलेल्या सांगली सिटी हायस्कूल मधील, 1996 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या सेवाध्यास फाउंडेशनचा सेवारुपी वृक्ष दिवसेंदिवस वाढत असून, या वृक्षाच्या छायेखाली निराधार अनेक वृद्ध स्त्रिया- पुरुष, कोरोना काळात ज्यांचे आई-वडील गेले आहेत अशा निराधार मुला-मुलींना सावली रुपी आधार मिळत आहे ,याचा उल्लेख करावयास शब्द देखील अपुरे पडतील .या सेवाध्यास फाउंडेशनच्या गणवेश वाटप कार्यक्रमास, सेवाध्यास फाउंडेशन मधीलच सहकारी केतन काबरा, ऐश्वर्या राठी, अश्विन जोग, शशिकांत गायकवाड, सारिका मंत्री, किरण चव्हाण, शितल नावंदर या सर्वांची आर्थिक स्वरूपाची मदत शब्दात वर्णन करता येणे शक्य नाही.
सदरहू कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.शैलजा पाटील यांनी केले तर आभार श्री रमेश काळे यांनी मानले. बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका वैशाली पाटील, सहा. शिक्षिका निलोफर गवंडी, सुनीता वडर इत्यादी उपस्थित होते.