जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
भारतीय जनता पार्टीच्या विरोधात, आज बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यामध्ये झालेल्या विरोधकांच्या बैठकीला, विरोधी सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली असून, विरोधीपक्षांच्या मध्ये एकजूट असल्याचे सिद्ध झाले आहे. आगामी येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्यामध्ये, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात, सर्व विरोधीपक्षीयांनी दोन हात करण्यासाठी, एकजुटीची तयारी केली आहे. काल शुक्रवारी झालेल्या बिहारची राजधानी पाटण्यामध्ये, सर्व प्रमुख विरोधीपक्षांची एक बैठक झाली असून ,आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने, सर्व विरोधीपक्षांच्या वतीने एकत्रित निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब झाले असून ,लवकरच जागा वाटपाचा मसुदा तयार करून, आगामी जुलैमध्ये सिमल्यात होणाऱ्या बैठकीत,त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. सध्याच्या परिस्थितीत राज्यनिहाय परिस्थिती लक्षात घेता, रणनीती आखण्यावर सर्व 15 विरोधीपक्षांनी भर दिला आहे. दरम्यान 10 जुलै ते 12 जुलै 2023 रोजी, सिमल्यामध्ये सर्व 15 विरोधी पक्ष्यांची दुसरी बैठक होत असून, किमान समान कार्यक्रमावर चर्चा होऊन, त्यावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
आजच्या विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी, काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे ,बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ,माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन ,झारखडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदी मान्यवर विरोधी पक्षांच्या नेत्यांसह, 27 प्रमुख नेत्यांची बैठकीस उपस्थिती होती. सर्व विरोधी पक्षांच्यामध्ये एकजूट होणे महत्त्वाचे असून, स्वच्छ मनाने चर्चा करून समोरासमोर थेट चर्चा व्हावी असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हंटले आहे. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे अध्यक्ष यांनी, दिल्लीतील अध्यादेशाच्या मुद्द्यावरून ,काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली. एकंदरीतच आगामी येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सर्व विरोधीपक्षांमध्ये, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढण्यामध्ये एकमत झाल्यामुळे, आगामी येणारी सार्वत्रिक निवडणूक राजकारणाच्या दृष्टीने, आरोप प्रत्यारोपाने गाजणार आहे.