जनप्रतिसाद नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगली येथील पारेख बंधूंच्यावर ईडीने धाडी टाकल्या असून त्यांची खाती इतर बँकांप्रमाणे आमच्या बँकेतही आहेत. त्या खात्यांची ईडी मार्फत चौकशी केली जात आहे. आमच्या बँकेत कोणताही गैरव्यवहार अथवा अनियमितता नाही. त्यामुळे कोणी अफवा अथवा चुकीच्या बातम्या पसरविण्या चा उद्योग करू नये,अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू,असा इशारा राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी इस्लामपूर येथील पत्रकार परिषदेत दिला. या चौकशी शी माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांचा काहीही संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रा.शामराव पाटील म्हणाले,काल (शुक्रवारी) सकाळी ११ वाजता ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी आमच्या सांगली येथील राजवाडा चौक शाखेस भेट देवून पारेख बंधूंच्या खात्यातील व्यवहाराबद्दल चौकशी केली. तसेच ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी बँकेच्या मुख्य कार्यालयातही त्यांच्या खात्यांची चौकशी केली आहे. यावेळी निर्लेखन केलेली खाती,एक रक्कमी परत फेड केलेली खाती आणि थकबाकीदार खात्यांचीही त्यांनी माहिती घेतली आहे. आम्ही त्यांना जी-जी माहिती मागितली,ती-ती माहिती दिली आहे. मात्र काही मंडळींनी माझ्या मागणीने चौकशी सुरू असल्याचा दावा केला आहे. तर काहींनी माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांचा या चौकशीही संबंध जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो पूर्वग्रह दूषित आणि खोडसाळपणाचा आहे.आमची बँक रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणा खाली असून रिझर्व्ह बँकेचे सर्वच बँकांच्या कारभारावर बारकाईने लक्ष असते. त्यांना काही अनियमितता आढळून आल्यास त्या बँकेवर त्यांच्याकडून तातडीने दंडात्मक कारवाई केली जाते. तसेच दरवर्षी शासकीय ऑडिटरकडून ऑडिट केले जाते. बँकेचे अंतर्गत ऑडिट केले जाते. मात्र आमच्या बँकेत आज अखेर कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही.आमच्या बँकेने गेल्या ४२ वर्षात पारदर्शी कारभार करीत ग्राहकांचा मोठा विश्वास संपादन केलेला आहे. राज्यातील एक अग्रगण्य शेड्यूल्ड बँक म्हणून आमच्या बँकेचा राज्यात,देशात नावलौकिक आहे. आमच्या संपूर्ण राज्यात ४६ शाखा असून २२७० कोटीच्या ठेवी आहेत आणि १५२७ कोटींची कर्जे दिली आहे. शून्य एनपीए असलेली आमची बँक आहे. आम्ही दरवर्षी १ एप्रिलला बँकेचा ताळेबंद जाहीर करीत आहे.
बँकिंग व्यवसाय हा नाजूक व्यवसाय आहे. ग्राहकांचा विश्वास हा बँकांचा श्वास आहे. चुकीच्या बातम्यांमुळे बँकेच्या ग्राहकांच्या विश्वास तडा जाऊ शकतो. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी बातम्या देताना काळजी घ्यावी,असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी बँकेचे संचालक संजय पाटील, माणिक पाटील,अनिल गायकवाड,उद्योगपती बाबुराव हुबाले,आर.एस.जाखले,उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.ए.पाटील प्रामुख्या ने उपस्थित होते.