जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
केंद्र सरकारने पुढील पाच वर्षासाठी हवाई वाहतुक योजनेसाठी, सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली असून, 2024 पर्यंत देशांतर्गत प्रवासी वाहतुकीचे उद्दिष्ट 45 लाख कोटी पर्यंत नेण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे असे प्रतिपादन केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले आहे, पण सांगलीतील कवलापूर विमानतळाचा केंद्राच्या प्रस्तावित हवाई वाहतुकीच्या एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमध्ये ,समावेश होण्यासाठी दिल्लीतील शासन दरबारी कोण प्रयत्न करणार ? कोण ताकद लावणार ? याबाबतीत सांगली शहरवासीयांची संभ्रमता निर्माण झाली आहे. संभाव्य लोकसभा निवडणुकीआधी, सांगली जिल्ह्यातील कवलापूर विमानतळाचा प्रश्न सुटणार का ? सांगली जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी या जिल्ह्यातील कवलापूर विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी, केंद्र सरकारकडे फार मोठी ताकद लावण्याची आवश्यकता असल्याचे, सध्याच्या एकूण परिस्थितीचा अभ्यास केला असता दिसून येत आहे.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आपल्या कारकिर्दीची 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, देशांतर्गत विमान वाहतुकीचा व प्रगतीचा आढावा घेतला आहे. सांगलीतील कवलापूर विमानतळ बचाव कृती समितीने सुद्धा जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना भेटून, विमानतळाच्या बाबतीत सर्व बाजू समजावून सांगितल्या आहेत. आता केंद्रात व राज्यात,सर्व बाजूंनी सांगली जिल्ह्यातील कवलापूर विमानतळाचा आवाज पोहोचवण्यासाठी, जोरदार प्रयत्न करण्यात येतील तसेच जून पासून याबाबतीत कार्यक्रम सुरू होईल अशी माहिती कवलापूर विमानतळ बचाव कृती समितीचे नेते पृथ्वीराज पवार व सतीश साखळकर यांनी दिली आहे.
सांगली जिल्ह्यातील कवलापूर विमानतळासाठी असलेली 160 एकर जागा, औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात असून, त्यावर औद्योगिक विकास महामंडळाकडून औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा प्रस्ताव होता, परंतु सांगली जिल्ह्यातील कवलापूर विमानतळ बचाव कृती समितीच्या नेत्यांनी, प्रसार माध्यमानी, सांगलीतील विविध मान्यवर नेत्यांनी व नागरिकांनी जोरदार कवलापूर विमानतळाच्या बाबतीत आवाज उठवल्याने ,सांगलीतील कवलापूरला विमानतळ कोणत्याही परिस्थितीत होणारच असा आशावाद सांगली जिल्ह्यातील नागरिकांना निर्माण झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत सांगली जिल्ह्यातील कवलापूरला विमानतळ हे होणारच असल्याचे चित्र अधोरेखित झाले असल्याचे दिसत आहे. कवलापूर विमानतळ बचाव कृती समितीचे नेते पृथ्वीराज पवार व सतीश साखळकर यांचे जोरदार प्रयत्न कवलापूर विमानतळाच्या बाबतीत सुरू आहेत.