जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
कर्नाटक राज्यातील चिकोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील नंदीपर्वत आश्रमाचे प. पू. श्री. १०८ आचार्य कामकुमारनंदी यांची अलिकडे अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली.ही घटना अत्यंत इनिंदनीय आहे. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सांगली जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे.
जैन धर्म आणि समाज हा जगा व जगू द्या तत्त्वानुसार मानवतावादी अहिंसक विचार मजबूत करणारा आहे.अशा अहिंसक भारतीय संस्कृतीचे रक्षण जैन मुनी करत असतात. त्यांचा त्याग फार मोठा आहे. राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्यासाठी जैन मुनी हे प्रवचनातून प्रबोधन करत असतात. मुनींची सेवा हे जैन समाजाचे भूषण आहे. मुनींच्या हत्येने जैन व सर्व अहिंसा प्रेमी समाज व्यथित झाला आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी व जैन मुनींच्या निर्विघ्न विहार, तपश्चर्या व निवास यामध्ये त्यांच्या रक्षणासाठी आवश्यक त्या कायदेशीर उपाययोजना केंद्र व राज्य शासनाने कराव्यात अशीही मागणी पृथ्वीराज पाटील यांनी केली आहे. आचार्यश्री कामकुमारनंदी यांच्या आत्म्यास चिरशांती व सदगती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करुन जैन समाजाच्या दुःखात सहभागी असल्याचे पत्रक त्यांनी प्रसिद्ध केले आहे.