जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
मुंबईत आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेकडील विज बिल घोटाळा प्रकरणी, 15 दिवसात एस.आय.टी.स्थापन करून, महापालिकेच्या 2010 पासून च्या वीज बिलाचे थर्ड ऑडिट केले जाणार आहे, अशी घोषणा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
आज विधान परिषदेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी विचारलेल्या विज बिल भ्रष्टाचार मुद्द्याच्या तारांकित प्रश्नावर ,राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत उत्तर देत होते. महाराष्ट्र राज्याच्या लोकायुक्तांनी सदरहू महापालिकेच्या वीज बिल घोटाळा प्रकरणी एस.आय.टी .नेमून चौकशीचे आदेश, 28 एप्रिल 2023 रोजी दिले होते. त्यानंतर एस.आय.टी.नेमण्यास विलंब होत असल्याच्या कारणावरून, दुसऱ्यांदा लोकायुक्तांनी, एस.आय.टी.नेमण्याचे आदेश दिले आहेत.आमदार गोपीचंद पडळकर यांनी महापालिकेच्या वीज बिल घोटाळा प्रकरणी, एस.आय.टी.नेमण्यास विलंब का होत आहे ?असा प्रश्न विचारला असता, उत्तरा दाखल राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत वरील घोषणा केली.सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने महावितरणाच्या नावे दिलेल्या धनादेशातून बरीचशी रक्कम, संस्था फर्मची बिले, खाजगी व्यक्तींच्या नावे वीज वीज बिलासाठी भरून, घोटाळा झाल्याचे 2020 मध्ये निष्पन्न झाले होते .महावितरण कार्यालयाच्या तपासणी विभागातून 1.29 कोटी रुपयांचा विज बिल घोटाळा निदर्शनास आला आहे ,तसेच महापालिकेच्या लेखापरीक्षण विभागातून 3.97 कोटी रुपयांचा वीज बिल घोटाळा उघडकीस आला आहे. याप्रकरणी राज्याच्या लोकायुक्तांनी एस.आय.टी.नेमून चौकशीचे आदेश दिले होते. आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या वेळी, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत उत्तरादाखल बोलताना म्हणाले की, महावितरणाच्या बिलातील भ्रष्टाचार हा ज्ञानेश्वर पाटील या महावितरणाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून झाला असून, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सध्या तो तुरुंगात असून, ज्ञानेश्वर पाटील यांच्याबरोबर महापालिका व महावितरण अधिकाऱ्यांची देखील चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वीज बिल घोटाळा प्रकरणी एस.आय.टी .स्थापन झाल्यानंतर ,चौकशीतून सर्व भ्रष्टाचाराच्या- घोटाळ्याच्या बाबी उघड होतील यात तीळ मात्र शंका नाही.