जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी)
बंगळूरमध्ये नुकतीच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात 26 विरोधी पक्ष नेत्यांची एकत्र बैठक संपन्न झाली व त्या बैठकीत आगामी 2024 या लोकसभा निवडणुकीत, सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला एकत्र लढवून हरवण्याचा नारा देत, 26 विरोधी पक्षांच्या एकवटलेल्या महाआघाडीचे नामकरण, "इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल एनक्लुझिव्ह अलायन्स "म्हणजेच "इंडिया" असे ठेवण्यात आले. मागील महिन्यात बिहारमध्ये सर्व विरोधी पक्षांची पहिली बैठक झाली होती. आगामी लोकसभेच्या 2024 च्या येणाऱ्या निवडणुकीत, समान कार्यक्रमावर एकत्र येऊन, त्याचा ॲक्शन प्लॅन लवकरच तयार करण्यात येणार आहे, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
दरम्यान बंगळूर मध्ये झालेल्या 26 विरोधी पक्षांच्या बैठकीत एकच सूर उमटला असून, सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला आगामी लोकसभा 2024 च्या निवडणूकीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन हरवण्याचा नारा देण्यात आला. त्याचप्रमाणे 26 विरोधी पक्षांच्या एकत्र आलेल्या महाआघाडीला, इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल एन्क्लुझिव्ह अलायन्स म्हणजे इंडिया असे करण्यात आले आहे. आज बंगळूर मध्ये झालेल्या ताज वेस्ट इन हॉटेलमध्ये, 26 प्रमुख विरोधी पक्षांचे नेते हजर होते ,शिवाय त्या बैठकीत आगामी लोकसभेच्या 2024 च्या समान एकत्रित कार्यक्रमावर, रणनीतीवर, धोरणावर समग्र चर्चा होऊन ,पुढील रणनीती ठरवण्याबाबत चर्चा झाली. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन लढले तर, कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान 26 विरोधी पक्षांचे एकत्रित आघाडीही, सत्ता मिळवण्यात स्वारस्य नसून, केवळ राज्यघटना, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्यायांचे मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आहे. सध्याच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ई.डी.,सी,.बी.आय.,आयकर विभाग यांचा हत्यारासारखा वापर केला आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजपमध्ये यावे म्हणून, काही ठिकाणी ब्लॅकमेल करण्यात येत आहे, याचाही पुनरुच्चार काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. देशातील विरोधी पक्षांची सरकारे खरेदी करून सत्ता हस्तगत करणे, एवढे एकमेव काम भारतीय जनता पार्टीचे असून सत्ताधारी भारतीय जनता पार्टी ही, आमच्या इंडियाशी मुकाबला कसा करणार? असा प्रश्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. आजचे स्वातंत्र्य धोक्यात आले असून, आम्ही सध्याच्या परिस्थितीत हुकूमशाही विरोधात लढत आहे, असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आजच्या बंगळूर मध्ये झालेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ,बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ,दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ,पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ,पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, सिताराम येचूरी, डी. राजा यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांची उपस्थिती होती.