जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
गेले काही दिवस जून महिन्यातील पाऊस हा राज्याची चिंता वाढवणारा विषय असला तरी ,येणारा जुलै महिन्यात पावसाची पूर्ण सरासरी भरून निघून ,राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस होणार असल्याचे संकेत, भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ.मृत्युंजय महापात्रा यांनी दिले आहेत. याबरोबरच देशात 94 ते 106% पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, राज्यात जवळपास सर्वत्र 106% पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मुख्यालयातून हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी, ऑनलाइन पत्रकार परिषद घेतली असून, त्यात ही सर्व माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान सध्य परिस्थितीत अल निनो सक्रिय असला तरी, त्याचा फारसा प्रभाव कुठेही पडणार नसल्याचे, डॉ.महापात्रा यांनी स्पष्ट केले आहे. देशात पूर्वोत्तर राज्यात सामान्य पेक्षा जास्त पाऊस व देशाच्या मध्य भागात चांगला पाऊस पडणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. बंगालच्या उपसागरात 4 जुलैपासून होणारा कमी दाबाचा पट्टा, मान्सूनचा पाऊस पडण्यास पोषक ठरणार असून, मान्सून अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. देशात सरासरी 280.40 मिलिमीटर पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी वर्तवला आहे. देशाच्या उत्तर भागात विशेषतः उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ,सामान्य पेक्षा पावसाचे प्रमाण यंदाच्या वर्षी कमी राहील. शिवाय आसाम, मेघालय ,कर्नाटक या राज्यात देखील पाऊस सामान्य पेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ.मृत्युंजय महापात्रा यांनी दिला आहे. मध्यंतरीच्या बिपर जॉयच्या चक्रीवादळामुळे यंदाच्या वर्षीचा मान्सूनचा पाऊस पडण्यास उशीर झाला आहे.