जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आम्हीच न्याय देऊन सोडवू शकत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आज पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार बैठकीत स्पष्ट केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सह आम्हाला 210 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याने आम्हीच महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांना न्याय देऊ शकतो. सर्व विरोधी पक्षांचा सध्याच्या परिस्थितीत आत्मविश्वास गमावला गेला असून सध्या सर्व विरोधी पक्षांचे नेते गोंधळलेले आहेत. आजच्या मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे यावेळी उपस्थित होते.दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम होत असतो व त्यानंतर पत्रकार परिषद घेतली जाते. त्याप्रमाणे आजच्या चहापानप्रसंगानंतर पत्रकार बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर अधिवेशनात चर्चा घडवून आणण्याची जबाबदारी ही सर्व विरोधी पक्षांची असते. सध्या सभागृहात विरोधी पक्षांची आमदारांची संख्या कमी असली तरी,आम्ही त्यांना कोणत्याही परिस्थितीत दुय्यम वागणूक देणार नसून,संख्येच्या बळावर विरोधकांकडे दुर्लक्ष होईल असे आमचे कडून वागणे होणार नसल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले .महाराष्ट्र राज्यातील शेतकरी सध्या पाऊसमान कमी असल्याने अडचणीत आला असून,अशा परिस्थितीत आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. महाराष्ट्रातील शैक्षणिक दर्जा घसरल्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेल्या पत्रानंतर उत्तरादाखल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही खरी वस्तुस्थिती नसल्याचा उच्चार केला आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात 24 विधेयके व 6 अध्यादेश मांडले जाणारा असून, सदरहू राज्याचे पावसाळी अधिवेशन 17 जुलै ते 4 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे .दरम्यान पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदारांची सभागृहात उपस्थिती आवर्जून ठेवली जाणार असून ,विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील. कोणत्याही परिस्थितीत बहुमताच्या जोरावर कामकाज रेटून नेण्याची भूमिका असणार नसल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. राज्याच्या मंत्रिमहोदयांकडून यापुढे सभागृहात महिलांबद्दल कुठल्याही परिस्थितीत अपशब्द वापरले जाणार नाहीत व अशा सूचना सर्वांना देण्यात आल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.