जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगली जिल्ह्यात पाऊस सुरू झाला असून, जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण अधिक आहे. पावसामुळे पूर, दरड कोसळणे, भूस्खलन या सारख्या संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य आपत्ती आणि अतिवृष्टीच्या अनुषंगाने घ्यावयाची खबरदारी याबाबत सर्व संबधित विभागांच्या अधिकाऱ्यांची दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या समवेत निवासी उपजिल्हाधिकारी दिपक शिंदे प्रत्यक्ष उपस्थित होते. तर महापालिका आयुक्त सुनील पवार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांच्यासह उपविभागीय अधिकारी व संबधित विभागाचे अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, आपत्तीच्या अनुषंगाने तालुकास्तरावर २४x७ नियंत्रण कक्ष सुरू ठेवावेत. या नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक गाव स्तरावरील यंत्रणेला द्यावेत. गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार गावातील आपत्ती व्यवस्थापन पथकांची माहिती सर्वांना द्यावी. या बरोबरच पथकात नियुक्त केलेल्यांनाही याबाबत अवगत करावे. आपत्तीच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या साहित्याचा आढावा घेऊन आवश्यक साहित्याची मागणी करावी. तसेच तालुकास्तरावर आपत्ती व्यवस्थापनाबाबत बैठका घेण्यात याव्यात, असे संगितले.हवामान खात्याकडून देण्यात येणारा पावसाचा इशारा सर्व यंत्रणांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. सद्या आपल्या जिल्ह्यात जरी पाऊसमान कमी असले तरी शेजारील जिल्ह्यात होत असलेल्या पर्ज्यन्यमानामुळे आपल्या जिल्ह्यातून वाहणाऱ्या नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता तालुकास्तरावरील यंत्रणेने अधिक दक्ष राहावे. छोट्या-छोट्या घटनांची माहिती वेळीच नियंत्रण कक्षास द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बैठकीत दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, आपत्ती व्यवस्थापनामध्ये सर्व यंत्रणेमध्ये समन्वय महत्वाचा आहे. यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेत काम करणाऱ्या टीमने गाव पातळीवरील स्थानिक लोकप्रतिनिधी, आपदा मित्र, पट्टीचे पोहणारे यांच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. तसेच आपत्तीमध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे भ्रमणध्वनी नेहमी सुरू राहतील याची खबरदारी घ्यावी. संभाव्य आपत्तीत नागरिकांना स्थलांतरित करावयाचे झाल्यास यासाठी तात्पुरत्या निवारा केंद्रात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करून ठेवावे. या ठिकाणी मोबाईल चार्जिंग, लाईट, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र शौचालय व्यवस्था करावी. निवारा केंद्राकडे जाणारे रस्ते चांगले असावेत. निवारा केंद्रांची उपविभागीय अधिकारी, पोलीस, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांनी पाहणी करावी.
आपत्ती काळात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विना अनुमती मुख्यालय सोडू नये, विना अनुमती रजेवर जावू नये, अशी सूचना करून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, आपत्ती व्यवस्थापनामध्ये काम करणाऱ्या सर्व यंत्रणांनी त्यांच्या कार्यालयाकडील वाहने सुस्थितीत ठेवावीत. उप प्रादेशिक परिवहन विभागाने जेसीबी, डंपर यासारख्या मोठ्या वाहनांची माहिती व यादी तहसीलदार यांच्याकडे द्यावी. एस. टी. महामंडळाने त्यांच्याकडील बसेसची आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी. आरोग्य विभागाने पुरेसा औषध साठा करण्याबरोबरच साथरोग नियंत्रणासाठी दक्ष रहावे. यासाठी आवश्यक पथके गठित करावीत, पाटबंधारे विभागाने धरणातील पाणीसाठा, विसर्ग याची माहिती देणे, सार्वजनिक बांधकाम विभागाने पाण्याखाली जाणारे रस्ते, पूल याची माहिती देणे, महावितरणने वीज अखंडित राहील याची दक्षता घेणे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बैठकीत दिल्या.