जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्याही परिस्थितीत, पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत चालू होणार असल्याची माहिती, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी या विमानतळाची संपूर्ण पाहणी केली असून, विमानतळ धावपट्टीचे अद्यावत काम पूर्ण झाले आहे. लवकरच धावपट्टीच्या कोटिंग चे काम पूर्ण होऊन, टर्मिनल इमारतीचे काम जलदरीतीने सुरू असून पुढील वर्षी ऑगस्ट पर्यंत सर्व कामे ,निर्धारित वेळेत पूर्ण होतील असे सांगितले आहे.
महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार, नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम ,पुढील वर्षाच्या ऑगस्टच्या आत, तीन ते चार महिने अगोदर पूर्ण करण्यास सांगितले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत, नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ चालू होणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाने नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या धावपट्टी वाढवण्याच्या कामासाठी 800 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरच उच्चस्तरीय बैठक होणार असून, राज्यातील सर्व विमानतळाच्या विभागाच्या यंत्रणा, एका विभागीय यंत्रणेच्या अधिपत्याखाली आणण्यासाठी एक कृतिशील आराखडा, तीन महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.