जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगली जिल्ह्यातील बेडग या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान पाडल्या प्रकरणी व जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी, बेडग गावचे सरपंच व उपसरपंचासह इतर व्यक्तींवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ,हा गुन्हा मागे घेण्यासाठी आज बेडग गावात बेमुदत कडकडीत बंद पाळण्यात आला. संपूर्ण बेडग ग्रामस्थांनी या गोष्टीबद्दल समर्थन देऊन बंद पाळला आहे. बेडगमधील सरपंच ,उपसरपंच व इतरांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन ,गावाची बदनामी तत्काळ थांबवण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी सकाळी 9:00 वाजता, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार आहे.
बेडग गावातील सरपंच ,उपसरपंच व अन्य इतर व्यक्तींच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ,गावात तणाव पूर्ण शांतता आहे. जिल्हा प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, बेडग गावात पोलीस बंदोबस्त चोख तैनात करण्यात आला असून, सद्य परिस्थितीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सर्वत्र नजर ठेवली गेली आहे. दरम्यान बेडग गावातील रविवारचा बाजार भरला नसून, परिसरातील मंगसुळी, आरग, लक्ष्मीवाडी, शिंदेवाडी, मल्लेवाडी, नरवाड ,म्हैसाळ, लिंगनूर ,कानडवाडी, कदमवाडी, खंडेराजुरी, खटाव, मानमोडी आदी गावांनी देखील सोमवारी निघणाऱ्या मोर्चास पाठिंबा देण्यासाठी, बंद ठेवून सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे .रविवारी शिपुर, पायपाचीवाडी ,एरंडोली आदी गावात ग्रामस्थांनी बंद पाळून, बेडग मधील ग्रामस्थांना व मोर्चास समर्थन दिले आहे .एकंदरीतच जिल्हा प्रशासनाच्या वतीने, सदरहू उद्भवलेल्या परिस्थितीवर योग्य तो मार्ग निघण्यासाठी कसोशीने प्रयत्न चालू केले आहेत. सांगलीचे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वत्र सामाजिक शांतता व सलोखा राखण्याचे आव्हान केले आहे.