जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात, चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी लवकरच शासनातर्फे नियोजन करण्यात येत असून, महाराष्ट्रातील जनतेला याचा फायदा होणार आहे. बँकांकडून कर्ज स्वरूपात मोठ्या प्रमाणात निधी घेऊन, उच्च दर्जाच्या सोयी सुविधा पुरवण्यात येणार असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापूर येथे केले.
कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात पाहणीच्या वेळी त्यांनी, अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, जनरल वाॅर्ड, डायलिसिस विभागात प्रत्यक्ष जाऊन सर्व सोयी सुविधांचा आढावा घेतला. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालया भेटीदरम्यान वैद्यकीय व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी, प्रत्यक्ष डॉक्टर्स, संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी ,कर्मचारी व रुग्णालयातील रुग्णांशी संपर्क साधून विचारपूस केली. राज्याचे शिक्षण मंत्री व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या पाहणीदरम्यान, डॉ.अजय चंदन वाले संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग मुंबई, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अधिष्ठाता डॉ.आरती घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ.गिरीश कांबळे आदी अधिकारी वर्ग उपस्थित होते. कोल्हापुरातील नवीन शेंडाळा पार्क येथे रुग्णालयाची इमारत चांगल्या पद्धतीने उभारली जात असून, त्यासाठी 842 कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली आहे. सदरहू रुग्णालयांमध्ये वसतीगृह पारिचारीका केंद्र, फॉरेन्सिक इमारत, महिला व पुरुष डॉक्टरांचे स्वतंत्र वसतिगृह आदी सोयी सुविधांचा समावेश आहे. येत्या 3 ते 4 वर्षात चांगली इमारत उभा करून दाखवू असा विश्वास, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी उपस्थितांना दिला. दरम्यान कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात कोणत्याही सोयी सुविधांचा, औषधांचा, साहित्यांचा तुटवडा पडू देणार नसल्याचे सांगितले असून ,जिल्हा वार्षिक योजनेतून 20 कोटी रुपये औषधासाठी , 20 कोटी रुपये शस्त्रक्रिया साहित्यासाठी दिले आहेत. दरम्यान मंत्री महोदय हसन मुश्रीफ यांनी रुग्णालयातील पदे तातडीने भरण्याच्या संचालकांना सूचना केल्या असून, भरती प्रक्रिया पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नेमणूका ही लवकरच केल्या जातील असे आश्वासन दिले आहे.