जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
देशात आयकर विवरणपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार 31 जुलै 2023 रोजी होती. यंदाच्या वर्षी आयकर विवरण पत्रे दाखल करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, जवळपास 16 टक्के दरवर्षीच्या मानाने अधिक आहे. आयकर खात्याच्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार 31 जुलै 2023 रोजी, एकूण 6.77 कोटी करदात्यांनी आयकर रिटर्न भरले असून ,चालू वर्ष 2023 -24 मध्ये एकूण 6.77 कोटी आयकर विवरणपत्रे दाखल करण्यात आली आहेत. मागील वर्षी 2022- 23 मध्ये 31 जुलै 2022 पर्यंत एकूण 5.83 कोटी आयकर विवरणपत्रे दाखल झाली होती. मागील वर्षाच्या मानाने यंदाच्या वर्षी म्हणजेच 2023- 24 मध्ये 16.1% अधिक आयकर विवरण पत्रे दाखल झाली असल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे. त्याचबरोबर 30 जुलै 2023 रोजी एकाच दिवसात 64.33 लाख आयकर विवरण पत्रे दाखल केली गेली आहेत. हा ही एक विक्रमच म्हणावा लागेल. विशेष म्हणजे 53.67 लाख जणांनी पहिल्यांदाच आयकर विवरणपत्रे दाखल केले असून, टॅक्स बेसच्या संख्येत चांगली वाढ झाली असल्याचे आयकर विभागाचे म्हणणे आहे.