जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करण्यासाठी,भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज परदेश दौऱ्यावरून सरळ बंगळूरला आले व त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करून, त्यांच्या धैर्याला व परिश्रमाला सलाम असल्याचे म्हटले आहे. 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा करण्यात येईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देशाच्या ऐतिहासिक सुवर्णक्षणाच्या चांद्रयान -3च्या सुवर्ण यशानंतर, भारतीय अंतराळ संस्थेच्या शास्त्रज्ञांचे (इस्रो) जगभरातून कौतुक होत आहे. जगाच्या अवकाश संशोधन संस्थेच्या व शास्त्रज्ञांच्या मध्ये,भारतीय अंतराळ संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांचा दबदबा निर्माण झाला असून, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अवकाश संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांच्या भेटीदरम्यान,भावुक झाल्याचे दिसून आले आहे.
23 ऑगस्ट हा दिवस,भारतातील सर्वांसाठी सोनेरी क्षणांचा प्रेरणादायी होता व आमच्या अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांचे करावे तेवढे कौतुक थोडे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे,शिवाय चांद्रयान-3 च्या सोनेरी क्षणाच्या सफल यशामध्ये ,नारीशक्तीचे ही मोठे योगदान असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. दरम्यान चांद्रयान -3 च्या विक्रम लँडरचा लँडिंग पॉईंट हा,शिवशक्ती पॉईंट म्हणून यापुढे अंतराळ संशोधन इतिहासात ओळखला जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. एकंदरीतच भारताच्या यशस्वी ऐतिहासिक चांद्रयान-3 च्या अभूतपूर्व सोनेरी क्षणाच्या यशानंतर, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांचा (इस्रो) जगभरात एक प्रकारे दबदबा निर्माण झाला आहे.