जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच, वसमतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हळद बाजार मध्ये, हळदीला प्रतिक्विंटल 30,000रुपयांचा भाव मिळाला असून, भविष्यात हळदीच्या दरामध्ये अजूनही बऱ्याच प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यांमध्ये हळदीचे मोठ्या प्रमाणावर पीक घेतले जात असून,वसमतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीचा बाजार हा जवळपास वर्षभर भरत असतो व हळदीची विक्री होत असते. काल वसमतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हळद बाजारामध्ये, परभणीच्या दिग्रस येथील शेतकरी शेषराव बोंबले यांच्या हळदीला, प्रतिक्विंटल 30,000रुपये भाव मिळाला असून,त्यांनी जवळपास 11 पोती हळद विक्रीस आणली होती. भारताच्या इतिहासातील हा हळदीच्या दराच्या बाबतीत मिळालेला प्रतिक्विंटल 30,000रुपये हा भाव उच्चांकी समजला जात असून, राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेली काही वर्षे हळदीला जवळपास प्रतिक्विंटल 5000 रुपये एवढाच भाव मिळत असून, राज्यातील शेतकऱ्यांनी जवळपास हळद लागवड करण्याचा विचार सोडून दिला होता व त्यामुळे सध्या राज्यातील हळद लागवडीचे क्षेत्रात घट झाली असून, राज्यात सध्याच्या अवस्थेत फक्त 30 टक्क्यांपर्यंत हळद लागवडीचे क्षेत्र असून, हे क्षेत्र मागील काही वर्षे हळद लागवडीच्या क्षेत्रापैकी फारच कमी आहे. त्यामुळे सध्याच्या बाजारपेठेत हळदीची टंचाई निर्माण झाल्यामुळे, हळदीच्या बाजारपेठेत चालू वर्षी हळदीला विक्रमी भाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकंदरीतच राज्यातील हळद लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या मध्ये, हळदीला मिळालेल्या रुपये 30000 प्रति क्विंटल दरामुळे उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे.