जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
भारतातल्या 26 विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीची, 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर 2023 रोजी तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. दरम्यान राज्यातील महाविकास आघाडीच्या 3 घटक पक्षांच्या 5 नेत्यांचा एक गट करण्यात आला असून, बैठकीच्या तयारीची सर्व जबाबदारी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली असणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
मुंबईत होणाऱ्या सर्व विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत, विविध विषयांवर, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तसेच सर्व विरोधी पक्षांच्या ठरलेल्या समान कार्यक्रमावर चर्चा अपेक्षित असून, या बैठकीस काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे ,संसदीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची, मुख्यमंत्र्यांची, विरोधी पक्ष नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.