पेठ ते सांगली राष्ट्रीय महामार्गाचे भाग्य उजळले, पेठ- सांगली राष्ट्रीय महामार्ग 860 कोटी रुपयांचे काम लवकरच सुरू होणार.--

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

पेठ ते सांगली राष्ट्रीय महामार्गावर यापूर्वी रस्ता फारच खराब झाल्यामुळे बरेचसे अपघात घडले होते. सांगलीतील विविध राजकीय पक्षांनी आंदोलने सुद्धा केली होती व प्रसारमाध्यमातून देखील या खराब रस्त्याच्या बाबतीत प्रतिक्रिया उमटल्या होत्या.आता पेठ ते सांगली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 एच. लवकरच मार्गी लागणार आहे. यासाठी सांगलीचे लोकप्रिय खासदार संजयकाका पाटील यांनी पहिल्यापासून आज अखेर प्रयत्न केला होता. त्यास आज बुधवार दिनांक 2 ऑगष्ट रोजी यश आले. जयपुर (राजस्थान) येथील आर. एस. बी.  इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीस सदरचा रस्ता करण्यासाठी कंत्राट मिळाले आहे, याबाबतची अधिकृत ऑनलाइन निविदा प्रक्रिया आज पूर्ण झाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पेठ ते सांगली हा सुमारे 41 किलोमीटरचा रस्ता गेली अनेक वर्ष चर्चेत आहे. सदरचा रस्ता हा वाहतुकीसाठी अत्यंत खराब मानला जात होता. मोठ्या प्रमाणात अवजड वाहनासह छोट्या-मोठ्या वाहनांची वाहतुकीमुळे रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत सातत्याने लोकांच्या तक्रारी होत्या आणि वस्तुस्थिती ही तशीच होती तसेच सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील तसेच त्या भागातून पुणे बेंगलोर रस्त्याला महामार्गाला जोडण्यासाठी सांगली ते पेठ हा एकच प्रमुख रस्ता असल्यामुळे सदरच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नेहमीच वाहतूक असते. सदरचा रस्ता हा सातत्याने दर्जाहीन होत असल्यामुळे याबाबत अनेक आंदोलने व निवेदन देण्यात आली, मात्र सदरचा रस्ता बऱ्याच वेळा डांबरीकरण होऊन ही त्यामध्ये पूर्णपणे या रस्त्याचा भाग हा पाणस्थळ असल्यामुळे डांबरीकरणाचा दर्जा राहिला जात नव्हता. त्यामुळे सांगलीचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील यांनी केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सदरचा रस्ता हा सिमेंट काँक्रिटीकरणाचा व्हावा यासाठी केंद्रीय पातळीवर पाठपुरावा केला व त्यादृष्टीने गेली अनेक महिने प्रयत्न केले त्यातूनच नामदार गडकरी यांनी सदरच्या रस्त्यासाठी 860 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली होती.

जानेवारी महिन्यामध्ये आष्टा येथे सदरच्या रस्त्याचे भूमिपूजन नामदार नितीन गडकरी, सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत पाटील, आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत केले होते, मात्र निविदा प्रक्रिया व त्यानंतरचीतांत्रिक प्रक्रिया यात मोठ्या प्रमाणात विलंब होत गेला त्यासाठी खासदार संजयकाका पाटील यांनी मंजुरीनंतर ही निविदा उघडण्यापर्यंत तसेच वित्तीय निविदा मंजुरीसाठी प्रयत्न केले. याबाबत खासदार संजयकाका पाटील म्हणाले की,पेठ ते सांगली हा रस्ता आता निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे व दर्जेदार काम होण्यासाठी माझा आग्रह राहणार असून हा रस्ता झाल्यामुळे सांगलीहून पुणे मुंबई कडे जाणाऱ्या लोकांना सोयीचे मार्ग उपलब्ध होणार आहे तसेच हळद व साखर व्यापार वाढीस मदत होणार आहे हा रस्ता चांगल्या कंडीशन मध्ये राहणारा असून अद्ययावत असा रस्ता सांगलीकरांच्या सेवेत उपलब्ध होत आहे. या रस्त्यामुळे सांगली जिल्ह्यातील पर्यटन तसेच औद्योगिक व शेतीच्या विकासास मोलाची मदत होणार आहे सांगली जिल्ह्यातील नागरिकांची बऱ्याच दिवसांची प्रलंबित मागणी पूर्णत्वास जात असल्याचा मला मनस्वी आनंद आहे.

या महामार्गासाठी  केंद्रीय रस्ते व महामार्गमंत्री ना. नितीनजी गडकरी, पालकमंत्री, स्थानिक आमदार, सर्व केंद्रीय अधिकारी, जिल्ह्यातील बांधकाम विभागाचे अधिकारी वर्ग यांचे सहकार्य लाभल्याबद्दल, जिल्ह्यातील जनतेने आनंद व आभार व्यक्त केले आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top