जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर जी १६४ अधिकृत बांधकामे झाली आहेत ती तात्काळ जमीनदोस्त करावीत, तेथील रेहान मलीक दर्गा परिसरात झालेले अवैध बांधकाम तात्काळ हटवण्यात यावे, तेथे भरणारा उरूस तात्काळ बंद व्हावा यांसह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना विशाळगडमुक्ती आंदोलनाच्या वतीने निवेदन देण्यात आले. या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी अतिक्रमण काढून टाकण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न चालू आहेत. पावसाळ्यानंतर हे अतिक्रमण काढून टाकले जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले.विशाळगडावरील शेवटचे अतिक्रमण दूर होईपर्यंत हिंदुत्वनिष्ठ शांत बसणार नाहीत,अशी माहिती माजी आमदार आणि विशाळगडमुक्ती आंदोलनाचे निमंत्रक श्री.नितीनराजे शिंदे यांनी दिली. जिल्हाधिकार्यांना निवेदन दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
या संदर्भात विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीचे श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘आज सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, गडप्रेमी संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. या संदर्भातील विषय सध्या उच्च न्यायालयात असून त्यासाठी बाजू मांडण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. अतिक्रमण काढून टाकण्याच्या संदर्भात प्रशासन कोणतीही हयगय करणार नाही. विशाळगडावर मद्य-मांस बंदीच्या संदर्भातील आदेश यापूर्वीच निघाले असून ते आदेश कोणत्याही परिस्थितीत मागे घेण्यात येणार नाहीत,असे आश्वासन जिल्हाधिकार्यांनी शिष्टमंडळास दिले आहे. विशाळगडावरील अतिक्रमाची शेवटची वीट निघेपर्यंत आमचा निर्धार चालू राहील.
या प्रसंगी सांगली येथील अधिवक्ता (सौ.) स्वाती शिंदे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर कार्यवाह श्री.आशिष लोखंडे, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री.दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री.गजानन तोडकर, हिंदु महासभाचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री.किशोर घाटगे, गजापूर येथील श्री. नारायण वेल्हाळ, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आलेल्या काही मागण्या..
१. पन्हाळा ते विशाळगड हा रणसंग्रामाचा गौरवशाली इतिहास समाजासमोर येण्यासाठी बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधीस्थळी भव्य ऐतिहासिक स्मारक उभे करा.
२. विशाळगडावरील पडझड झालेल्या सर्व मंदिरांचा आणि पुरातन वास्तूंचा जिणोद्धार करावा, तसेच माहिती फलक गडावर ठिकठिकाणी लावण्यात यावेत.
३. श्री वाघजाई मंदिराच्या समोर असलेल्या झराच्या पाण्याला रेहानबाबाचे तीर्थ सांगून लोकांची फसवणूक करण्यात येत आहे, ती ताबडतोब थांबवण्यात यावी.
४. विशाळगडावर भरवण्यात येणार्या उरुसात सहस्र कोंबड्या आणि बकर्यांच्या कत्तली करण्यात येतात,तरी त्या उरुसावर शासनाकडून तात्काळ बंदी घालण्यात यावी.